“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:15 IST2025-08-11T16:15:02+5:302025-08-11T16:15:02+5:30
Congress News: आपल्यासमोर आव्हाने खूप आहेत. जनता आपल्याबरोबर आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
Congress News: आपल्यासमोर आव्हाने खूप आहेत, काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले; पण, भाजपा मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. सत्ता ही सामान्य माणसांसाठी असली पाहिजे. लोकांना जोडण्याचे काम करा, तुमची ओळख कामाने, कर्तृत्वाने निर्माण करा. घराघरात जा व लोकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करा. राज्यात भाजपा युतीचे लुटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. प्रचंड लुट सुरू असून ४० टक्क्यांचे कमिशन लाटले जात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रात व राज्यात काँग्रेस व राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू
महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आपण वारस आहोत. काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. काँग्रेस पक्षाने कठीण काळ पाहिलेला आहे व पराभवही पाहिलेला आहे; पण, यातूनही काँग्रेस पक्षाने उभारी घेतली व पुन्हा विजय संपादन केला. राज्यातील सरकारचा कारभार भयानक आहे, विधान भवनात घुसुन मारहाण होते, कँटिनमध्ये आमदार मारामारी करतो तर कोण गोळीबार करतो, भ्रष्टाचार बोकाळला आहे. पण आपल्याला जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. बँकिंगचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत. नाफेडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे मुद्दे घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. जनता आपल्याबरोबर आहे, त्यांची कामे करा व काँग्रेस विचाराचे, राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू, असा विश्वास ज्येष्ठ नेते व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या कार्यशाळेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असावा हा त्यामागचा उद्देश आहे. यात अभिमुखता, परिचय आणि संवाद ही त्रिसुत्री असणार आहे. दोन दिवस वरिष्ठ नेते व विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाईल व कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले असा काँग्रेसचा विचार नसून काँग्रेस हा नितंरत चालणारा व स्वराज्याच्या दिशेने कुच करणार पक्ष आहे.