काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर; पुढील सुनावणी ४ एप्रिलला
By नितीन पंडित | Updated: February 21, 2026 13:57 IST2026-02-21T13:56:47+5:302026-02-21T13:57:01+5:30
राहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर; पुढील सुनावणी ४ एप्रिलला
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: आर एस एस संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर झाले.या प्रकरणात राहुल गांधी यांनी यापूर्वी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात दुसरा जामीन देण्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजर झाले होते.भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी एम कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी उपस्थित झाले होते.यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे देखील न्यायालयात उपस्थित होते.यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन राहुल गांधी यांनी दिला असून पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.
कुणालाही न भेटताच राहुल गांधी निघाले
राहुल गांधी भिवंडी न्यायालयात येणार असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गांधी यांना भेटण्यासाठी न्यायालयात व परिसरात हजर होते मात्र राहुल गांधी कुणालाही न भेटता राहुल गांधी भिवंडी न्यायालयातून निघून गेले.
१५ मिनिटे आधीच न्यायालयात हजर
राहुल गांधी यांच्या प्रकरणाची सुनावणी शनिवारी पावणे अकरा वाजता होती.मात्र ते १५ मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते.
राहुल गांधी नेहमीच न्यायालयाचा आदर करतात,त्यामुळे ते पंधरा मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते.जामिनीच्या बॉण्डवर सह्या व इतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते निघून गेले अशी माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.
भिवंडीत चोख बंदोबस्त
राहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भारतीय कायद्याप्रमाणे जामीन घेणे आवश्यक होते. त्यानुसार राहुल गांधी यांना पुन्हा न्यायालयात सुनावणीसाठी याव लागल. न्यायव्यवस्थेपेक्षा दुसर काही मोठ नाही, हे न्यायालयाने आज सिद्ध केल आहे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण
२०१४ च्या लोकसभा निवडणुक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी 'महात्मा गांधी हत्येमागे आर.एस.एस. या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात आर एस एस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल खाजगी फिर्याद दाखल केली आहे.
काळे झेंडे दाखविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध
मुलुंड टोल नाका परिसरात राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे अत्यंत निंदनीय आहे.राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे सर्वांना माहीत आहे.अशा परिस्थितीत त्यांना काळे झेंडे दाखवणे चुकीचे आहे.याठिकाणी काहीही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.त्यामुळे सरकारचा व पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी दिली.त्यांच्या सोबत उपमहापौर तारिक मोमीन यांनी देखील या घटनेचा निषेध केला.
मानहानीच्या खटल्याला बारा वर्षे लागणे दुर्दैवी- खा.बाळ्या मामा
२०१४ चा मानहानीचा खटला आता २०२६ पर्यंत सुरु आहे , मानहानीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात लवकरात लवकर निकाली लावणे गरजेचे आहे.मात्र या खटल्याला बारा वर्षे लागली हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.