Kunal Patil Joins BJP: मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काम करत होतो, त्यावेळी त्यांच्याकडे काम घेऊन जात नव्हतो. मात्र, एकदा गेलो, तेव्हा त्यांनी माझे ते काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासकामे करणारी व्यक्ती आहे. माझ्या भागाला न्याय मिळाला, मला या पुढे काही नको. धुळे हा महत्त्वाचा जिल्हा आहे. इथे ग्रोथ सेंटर तयार करायचे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे, असे कौतुकोद्गार कुणाल पाटील यांनी काढले. काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
धुळे व जळगावचे लोक खूप समाधानी आहोत. दोन प्रेमाचे शब्द बोलले आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली तरी बस. तुम्हाला अडसर होईल, अशी कुठलीही घटना घडणार नाही, असा शब्द भाजपाच्या सर्व जुन्या लोकांना देतो. भाजपाने या ठिकाणी पक्ष टिकवून ठेवला, याची मला जाणीव आहे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कुणाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा महत्त्वाचा अन् ऐतिहासिक क्षण
दक्षिण मुंबईत ही धुळ्याने ताकद दाखवली आहे. हा महत्त्वाचा व ऐतिहासिक क्षण आहे. माझ्यासह कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यासाठी कठीण प्रसंग आहे. भाजपात प्रवेश करत आहोत. तीन पिढ्यांची ७५ वर्षांची परंपरा सोडून एक सदस्य भाजपात प्रवेश करत आहे, हे खरे आहे. चुडामण अण्णा यांची १९६२ मध्ये जवाहरलाल नेहरूंची क्रेझ असताना जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून ओळख होती. २५ वर्षे त्यांनी सभागृहात दिली. १९७८ मध्ये माझे वडील आमदार झाले. २००९ पर्यंत ते आमदार होते. माझ्या आधीच्या पिढीने विकासाची परंपरा दिली आहे. ती जबाबदारी आमच्यावर आहे, असे कुणाल पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, काँग्रेसमध्ये असताना मी माझे काम चोखपणे पार पाडले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या भागात विकास होण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे. लहानपणापासून पाहिले की, काँग्रेस हा आपला पक्ष आहे आणि काँग्रेसशीच आपण एकनिष्ठ राहायचे. आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही मोठे झालो. मी २०१४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो. फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिले. २०१९ मध्येही लोकांनी मला साथ दिली, असे कुणाल पाटील यांनी सांगितले.