काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, सतेज पाटील यांच्यासह या नेत्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:48 IST2025-03-01T16:46:49+5:302025-03-01T16:48:40+5:30
Maharashtra Congress News: काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील, अमिन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, सतेज पाटील यांच्यासह या नेत्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी
मुंबई - काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील, अमिन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची आणि सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
विधानपरिषदेत गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोदपदी आ. अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
"विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह व ऊर्जा कायम असून जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी पक्षाचे नवे शिलेदार महत्त्वाची भूमिका बजावतील”, अशा शब्दात प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.