Congress Harshwardhan Sapkal Replied Thackeray Group: एकीकडे विविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकांबद्दल अपशब्द वापरले तर ते नाशिकला आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू, काळे फासता आले नाही तर त्यांच्यावर दगडफेक करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. यावरून आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना थेट शब्दांत इशारा दिला आहे.
''...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाच्या नेत्याने दिलेल्या धमकीवर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचे देशासाठी बलिदान आहे. राहुल गांधी यांच्या आज्जी इंदिरा गांधी यांचेही देशासाठी बलिदान आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस अशा भ्याड धमकीला घाबरत नाही. स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे. राहुल गांधी यांना आहे. ते आमचे नेते आहेत. अशा धमक्या कोणी देत असेल, तर राहुल गांधी सोडा, आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता त्यांना पुरुन उरेल. त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधी आणि काँग्रेसला देऊ नये.
राहुल गांधी यांनी सावरकरांना अपशब्द वापरलेले नाहीत
राहुल गांधी वीर सावरकर यांच्याबद्दल काय बोलले, याची समीक्षा होत असेल, तर त्याचे स्वागत आहे. राहुल गांधी यांनी शेलक्या शब्दांत सावरकरांवर टीका केली नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांना अपशब्द वापरलेले नाहीत. राहुल गांधी जे बोलले, ते इतिहासाचे दाखले आहेत. एकट्या राहुल गांधींनी नाही, तर अनेक इतिहासकारांनी तशा स्वरुपाचे दाखले दिलेले आहेत. अनेक पुस्तकेही अलीकडच्या काळात प्रकाशित झालेली आहेत.
अरुण शौरी हे भाजपाचे खासदार होते. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनीच एक पुस्तक सावरकरांवर लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत. त्याचाच संदर्भ राहुल गांधी यांनी दिला आहे. या अशा धमक्यांचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. नेतृत्व आपल्या ठिकाणी आहे; पण, काँग्रेसचा कार्यकर्ता अशा धमक्यांना निपटून घेईल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.