“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:45 IST2025-09-15T18:41:55+5:302025-09-15T18:45:37+5:30
Congress Harshwardhan Sapkal Mumbai PC News: शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal Mumbai PC News: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. शेतकऱ्यांचे सर्वकाही पावसाने हिरावून घेतले आहे. पिकं तर गेली आहेतच लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असेही सपकाळ म्हणाले.
पावसामुळे मुंबईतील रस्त्यांचे मोठे नुकसान
पावसामुळे मुंबईतील रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. पण महानगरपालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या, त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला असून वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महानगरपालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लुट सुरू आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.
दरम्यान, बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणवीस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक पाहता शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही फडणवीसांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणीवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला.