“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:41 IST2025-10-01T16:37:03+5:302025-10-01T16:41:50+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान मान्य नाही, असा दावा करत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली.

“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान मान्य नाही, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही. मनुस्मृतीवर देश चालावा हा त्यांचा आग्रह आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले पण संघाने मात्र जाती धर्मात द्वेष वाढवला, त्यांनी विविधतेत एकता गुंडाळून ठेवली आहे. १०० वर्षांत विषारी व विखारी विचार पेरला, माणसा-माणसात भेद केला, मंदिर प्रवेश नाकारला, स्त्री-पुरुष समानता नाकारली. संघाच्या विषारी झाडाच्या छायेत भ्रष्टाचार वाढला, बहुजन समाज नागवला गेला. आम्ही भारताचे सर्व जाती पंथाचे लोक रा. स्व. संघाच्या या १०० वर्षाच्या काळ्या कारकिर्दीचा धिक्कार करतो, निषेध करतो. १०० वर्ष पूर्ण करताना संघाने आता संविधान अंगिकारावे, महात्मा गांधींचा फोटो व संविधान संघ कार्यालयात ठेवावे तसेच रा. स्व. संघाची नोंदणी करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
संविधान सत्याग्रह पदयात्रेचा तिसरा दिवस होता. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व राजसत्ता असावी हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या या धोरणाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करतो. संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दिवाळीआधी शेतकरी कर्जमाफी द्या
राज्यातील अतिवृष्टी व महापुरावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी हवालदिल आहे, पिकं नष्ट झाली आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे, त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे पण सर्वे व पंचनाम्याच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, तर जमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत. महायुतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ असून दिवाळी पूर्वी कर्जमाफी करावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.