“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:42 IST2025-12-04T17:42:53+5:302025-12-04T17:42:53+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: मतचोरी प्रश्नी काँग्रेस पक्षाने १४ डिसेंबर रोजी दिल्लीत मोठी रॅली आयोजित केली आहे, अशी माहित हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: राज्यातील भाजपा महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची एका वर्षातच बौद्धिक व आर्थिक दिवाळखोरी निघाली आहे. सत्तेत येताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार, नोकर भरती करणार अशी आश्वासने दिली होती पण त्याचा आता महायुती सरकारला विसर पडला आहे. कोयता गँग, खोके, आका, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया हे महायुती सरकारने राज्याला दिले आहे. जाती धर्मात वाद निर्माण करण्याचे काम सरकारने केले असून ‘पैसा फेक तमाशा देख’, हे वगनाट्य जोरात सुरू आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने धुमाकुळ घातला. शेतातील पिके वाहून गेली, शेत जमीन खरडून गेली, सर्व हंगाम वाया गेला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने ३३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे जाहीर केले पण ते कोणाला मिळाले हे माहित नाही. केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावही पाठवला नाही. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत महाराष्ट्र सरकारची लाज काढली. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेला नाही हे केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच सांगितले, यावरून भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला निधी आणला नाही व प्रस्तावही पाठवला नाही कारण भाजपा महायुती सरकारला शेतकऱ्यांना मदतच करायची नाही, असा दावा सपकाळ यांनी केला.
१४ डिसेंबर रोजी दिल्लीत देशपातळीवर मोठी रॅली
राज्यात १० वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत परंतु या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष, प्रशासन व निवडणूक आयोग यांनी निवडणूक प्रक्रियेची थट्टा केली आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने निवडणूक प्रक्रिया सुधारण्यावर भर देत आहे. मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे. निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांच्यासारख्या कणखर निवडणूक आयुक्ताची गरज आहे. मतचोरी प्रश्नी काँग्रेस पक्षाने १४ डिसेंबर रोजी दिल्लीत देशपातळीवर मोठी रॅलीही आयोजित केली आहे, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.