“तसे स्टेटस ठेवले तर गैर काय? रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:46 IST2025-02-23T15:44:31+5:302025-02-23T15:46:12+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: रवींद्र धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

“तसे स्टेटस ठेवले तर गैर काय? रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. संपूर्ण राज्यातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला यश येताना दिसत नाही. तर आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातील अनेक जण शिंदे गटात येणार असल्याचे दावे केले जात आहे. सातत्याने होत असलेल्या गळतीमुळे ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी डोके वर काढले आहे. या सगळ्यांवर माजी आमदार धंगेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. रिल टाकण्याचे माझ्या मनात होते. शिवजयंतीचे वातावरण होते आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता. गळ्यात भगवा रुमाल होता. त्या फोटोवरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आणि वातावरण असे झाले की, मी शिवसेनेत चाललो आहे. भगव्या उपरण्यातच जन्म झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. मी मानवता कार्यकर्ता आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली.
रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत
पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर गैर काय? माझे त्यांच्याशी बोलणे झाले, ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.तसेच छावा चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. त्याला सगळे संदर्भ आहेत. ही कादंबरी एक ठेवा आहे. या कादंबरीवर चित्रपट असेल तर त्यावर कुठलाही आक्षेप नोंदवण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बुलढाण्यात अफूची शेती पकडली गेली. ती राज्यातील सगळ्यात मोठी कारवाई होती. या मागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे, असे ते म्हणाले.