काँग्रेसचा मोठा दणका! भाजपला मदत केल्याप्रकरणी जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:44 IST2026-04-01T16:42:54+5:302026-04-01T16:44:57+5:30
Jalna Congress: उघडपणे पक्षशिस्तीचा भंग केल्याने झाली कारवाई

काँग्रेसचा मोठा दणका! भाजपला मदत केल्याप्रकरणी जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन
Jalna Congress: जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हि कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांनी दिली. महानगरपालिकेत स्विकृत सदस्य नियुक्ती करतेवेळी काँग्रेस नगरसेवक फरुक सादिक तुंडीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनिल अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे या ७ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक मोठी खळबळ उडाली. महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवेळी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत, काँग्रेस पक्षाने आपल्या सात नगरसेवकांना तडकाफडकी निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध जाऊन भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे समोर आले होते. या गंभीर प्रकरणाची पक्षांतर्गत चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात या सदस्यांनी जाणीवपूर्वक पक्षशिस्तीचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने, प्रदेशाध्यक्षांनी कठोर पाऊल उचलत या सातही जणांना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित केले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे:
१. फारुक सादीक तुंडीवाले (गटनेते)
२. इम्रान खान आमानुलला खान
३. फरहाना अ. रऊफ अंसारी
४. सुनिल अशोक बोरडे
५. मयूरी दिनेश देणे
६. रुबीना मजीद पठाण
७. अनिल अशोक तिरुखे
राजकीय वर्तुळात चर्चा
या कारवाईचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच याची प्रत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. एकाच वेळी सात नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने जालना काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.