काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:11 IST2025-10-03T18:10:19+5:302025-10-03T18:11:03+5:30
Congress Meeting Municipal Elections 2025 : विविध विषयांवर होणार विचारमंथन

काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
Congress Meeting Municipal Elections 2025 : विजयादशमीच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे झाले. भाजपा, मनसे, राष्ट्रवादीचे दोन गट यांचेही कार्यकर्ते मेळावे आणि पदाधिकारी बैठकांचे सत्र सुरूच आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षही आगामी निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ आणि ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील या कार्यशाळेत विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांचेही मार्गदर्शनपर संबोधन असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता हे उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण या विषयावर सपकाळ मार्गदर्शन करणार आहेत.
या विषयांवर होणार विचारमंथन
याशिवाय, शहरी प्रश्नातील सक्रियता आणि राजकारण या विषयावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. 'आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण' या विषयावर आशितोष शिर्के, राजू भिसे, संग्राम खोपडे हे सत्र संचलन करतील. घरपट्ट्यांची चळवळ या विषयावर संवाद व शहरांकरता भविष्यातील कार्यक्रम या मुद्द्यांवर चर्चा होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे स्वागत करणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी करणार आहेत.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री नितीन राऊत मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटिव्ह व लोकसंवादातून लोकचळवळ या मुदद्यांचाही यावेळी उहापोह केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.