शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक, युती सरकारविरोधात राज्यभर केलं जोरदार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:03 IST2025-03-03T20:03:02+5:302025-03-03T20:03:19+5:30

Congress News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आंदोलन करण्यात आले. भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी असून निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांकडे भाजपा युती दुर्लक्ष करत आहे.

Congress aggressive on the farmers' issues, organized a strong protest against the coalition government across the state | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक, युती सरकारविरोधात राज्यभर केलं जोरदार आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक, युती सरकारविरोधात राज्यभर केलं जोरदार आंदोलन

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आंदोलन करण्यात आले. भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी असून निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांकडे भाजपा युती दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या भाजपा युती सरकारविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, रास्त वीज पुरवठा द्यावा, पिक विमा व कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करावी, शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान तात्काळ मिळावे, सोयाबीन हमीभावातील फरक, सोलार पंप तात्काळ देण्यात यावे, शेतमाला हमीभाव द्यावा, दूध दरवाढ द्यावी यासारख्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भाजपा युती सरकारच्या विरुद्ध हे आंदोलन करण्यात आले.

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. नापिकी आणि शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी आणि महिलांना सुरक्षिततेची हमी द्या नाहीतर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, प्रकाश मुगदिया, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बुलढाणा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चात हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपने निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे या अधिवेशनात शेतक-यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, माजी आमदार राजेश एकडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व नांदेड महानगरपालिकेतील बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मा. आ हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम,शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, महिला कॉंग्रेस अध्यक्षा रेखाताई चव्हाण, मा.महापौर जयश्रीताई निलेश पावडे, करुणाताई जमदाडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी विरोधी भाजपा यती सरकारविरोधात धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन सामील झाले होते. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

राज्यातील इतर जिल्ह्यातही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजपा युती सरकारचा निषेध करण्यात आला. उद्या ४ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांच्या प्रश्नी आंदोलन केले जाणार आहे.

Web Title: Congress aggressive on the farmers' issues, organized a strong protest against the coalition government across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.