कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 06:47 IST2025-07-08T06:46:39+5:302025-07-08T06:47:25+5:30
महायुतीकडील चर्चेचे दार शिंदे व राज किलकिले ठेवतायत, अशी कुजबुज ठाण्यात शिंदेसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत.

कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दाेन्ही भावांमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून दिलजमाई झाली. दाेन्ही कुटुंबे एकत्र आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह शिंदेसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमीलन मेळाव्यावर टीका केली. केवळ मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर डाेळा ठेवून ते एकत्र आले, हे सुज्ञ जनता ओळखून असल्याची टीका सरनाईक यांनी पत्राद्वारे केली. त्यानंतर एक दिवस उलटल्यावर अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांच्यावर व मनोमीलन मेळाव्यावर टीका करू नका, असा अलिखित फतवा जारी केला. राज ठाकरे यांनीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना युतीबाबत भाष्य करू नका, असा आदेश दिला. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीबाबत संभ्रम वाढला. महायुतीकडील चर्चेचे दार शिंदे व राज किलकिले ठेवतायत, अशी कुजबुज ठाण्यात शिंदेसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत.
‘असंतोषग्रस्त मोटारीची’ आठवण
राज ठाकरे यांनी शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला त्या दिवशी शिवसेना नेते स्व. मनोहर जोशी व खा. संजय राऊत हे राज यांची समजूत काढायला तेव्हाच्या ‘कृष्णकुंज’वर गेले होते. जोशी हे राऊत यांच्या मोटारीतून राज यांच्या घरी गेले. दोघे राज यांची समजूत काढत असताना इमारतीखाली राज समर्थक बिथरले व त्यांनी राऊत यांची मोटार उलटीपालटी करून त्यावर नाचले. राऊत चालत ‘सामना’ कार्यालयात गेले. उद्धव-राज पुन्हा एकत्र आले तेव्हा राऊत यांच्या त्या ‘असंतोषग्रस्त मोटारीची’ आठवण कुणाला फारशी झाली नाही. उद्धव-राज यांची युती अभेद्य राहावी, याकरिता दोन्हीकडील नेते प्रयत्नशील आहेत. जागावाटप, युतीची चर्चा करताना दुसऱ्याच कुणाच्या मोटारीतून जायची क्लृप्ती करण्याची कुजबुज उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.
कृषिमंत्री गायब, जाहिरात द्यावी का?
विधानसभेत प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याबाबतच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू होती. कृषिमंत्री उत्तर देणार असा उल्लेख कामकाजात होता. मात्र, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले उत्तर देत होते. आमदार नाना पटोलेंच्या ही बाब लक्षात आली. “गोगावले कृषिमंत्री आहेत का? कृषिमंत्री म्हणून आम्हाला माणिकराव कोकाटेंचा परिचय करून दिला होता. ते सभागृहात दिसत नाहीत, त्यांना मंत्रिपदावरून काढले आहे का?” असा सवाल पटोले यांनी विधानसभेत विचारला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर “कृषिमंत्री गायब झालेत त्याबद्दल जाहिरात द्यायची का? गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होती, तेव्हाही कृषिमंत्री सभागृहात नव्हते,” असा निशाणा पटोलेंनी यानिमित्ताने साधला.
आमदारांच्या गिफ्ट बॉक्समध्ये काय?
शनिवारी आणि रविवारी विधिमंडळातील कामकाजाला सुट्टी असते. त्यामुळे सोमवारी अधिवेशनाला येताना आमदार, मंत्री सहकाऱ्यांसाठी त्यांच्या त्याच्या विभागातील काही ना काही भेटवस्तू घेऊन येतात. त्याचा प्रत्यय पुन्हा आला. विधान भवनात आमदारांसह येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी होती. आमदारांच्या स्वीय सहायकांचीही तपासणी करून सोडण्यात येत होते. इतक्यात गुलाबी पेपरमध्ये गुंडाळलेले अनेक बॉक्स घेऊन एका आमदाराचे पीए आले. त्याचीही तपासणी झाली आणि कँटीनबाहेर एकावर एक बॉक्सेसचे थर रचले गेले. पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनी सहकारी आमदार मित्रांसाठी ही भेटवस्तू आणली होती. अन्य आमदारांच्या पीएना, मंत्र्याच्या कार्यालयात जाऊन ते बॉक्स पोहोचविण्यात येत होते. मात्र, पॅकिंग केले असल्यामुळे त्यात नेमके काय याची चर्चा सुरू होती.