कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो : निस्पृह सार्वजनिक जीवनाची पंचाहत्तरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:59 IST2025-12-28T09:56:27+5:302025-12-28T09:59:35+5:30
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी गेली पाच दशके जे योगदान दिले आहे, ते या देशातील पुरोगामी चळवळीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरले आहे.

कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो : निस्पृह सार्वजनिक जीवनाची पंचाहत्तरी
देविदास तुळजापूरकर, माजी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र
कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो आज त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसात पदार्पण करत आहेत. हा टप्पा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे, तितकाच—किंबहुना त्याहून अधिक—त्यांच्या सार्वजनिक जीवनाच्या संदर्भात दखलपात्र आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी गेली पाच दशके जे योगदान दिले आहे, ते या देशातील पुरोगामी चळवळीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरले आहे.
डॉक्टरीसारख्या प्रतिष्ठित व स्थिर पेशातून येणारा मध्यमवर्गीय तरुण सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक चळवळीकडे आकृष्ट होतो आणि तेच आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट व प्रयोजन बनवतो—हा निर्णय सहज किंवा सोपा नव्हता. लौकिक अर्थाने सुखी, सुरक्षित आणि स्थिर आयुष्य निवडण्याऐवजी त्यांनी जाणीवपूर्वक संघर्षाची वाट स्वीकारली. हा तो काळ होता, जेव्हा त्यांच्या पिढीतील अनेक तरुण मार्क्स, लेनिन, माओ त्से-तुंग, चोऊ एन-लाई, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेत होते. या वैचारिक प्रवाहातीलच एक सशक्त नाव म्हणजे डॉ. भालचंद्र कांगो.
या पिढीतील काही जण ज्याव्यवस्थेचा विरोध करत होते, त्याच व्यवस्थेचा भाग झाले; काहींनी निराशेतून संघर्षाची वाट सोडली. मात्र अत्यंत मोजके असे होते, ज्यांनी अखेरपर्यंत चिकाटीने, कोणतीही तडजोड न करता आपली वाटचाल सुरू ठेवली—कॉम्रेड कांगो हे त्यांपैकी एक. त्यांच्या सामाजिक-राजकीय जीवनाची सुरुवात ‘युवक क्रांती दल’पासून झाली. दलित विद्यार्थी शिष्यवृत्ती आंदोलन, कॅपिटेशन फीविरोधी लढा आणि मराठवाडा विकास आंदोलनात ते अग्रभागी राहिले. ही आंदोलने मराठवाड्याच्या सामाजिक-राजकीय ओळखीचा अविभाज्य भाग ठरली. पुढे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड व्ही. डी. देशपांडे यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या कामातून कामगार चळवळीत स्वतःला पूर्णतः झोकून दिले.
मराठवाडा विकास आंदोलनाच्या परिणामी उभ्या राहिलेल्या उद्योग-कारखान्यांतील कामगारांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. याच काळात ते कम्युनिस्ट चळवळीशी अधिक घट्टपणे जोडले गेले आणि कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी यांच्याशी त्यांचा वैचारिक व मानवी बंध दृढ झाला. याच नात्यांतून सुजाता यांचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला—ज्या पुढे त्यांच्या जीवनसाथी बनल्या.
१९७० ते २०२५ या कालखंडात महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख पुरोगामी संघर्षांत कॉम्रेड कांगो न थकता सहभागी राहिले. नामांतराचा ऐतिहासिक लढा असो वा एनरॉनविरोधी जनआंदोलन—प्रत्येक ठिकाणी त्यांची भूमिका ठाम आणि सक्रिय राहिली. विषमता निर्मूलन परिषद, विद्रोही साहित्य संमेलन, विचारवेध संमेलन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन अशा वैचारिक मंचांवर त्यांची उपस्थिती सातत्याने जाणवली. दलित, आदिवासी, स्त्रीमुक्ती, भूमीहीन, शेतकरी आणि शेतमजूर चळवळींशी त्यांचे नाते केवळ सहानुभूतीपुरते नव्हे, तर प्रत्यक्ष सहभागाचे राहिले आहे.

या दीर्घ वाटचालीत अनेकदा कम्युनिस्ट चळवळीवर तीव्र टीका झाली—आणीबाणीतील भूमिकेपासून जात-वर्ग प्रश्नांवरील प्रारंभीच्या भूमिकेपर्यंत. अवहेलना, गैरसमज आणि आरोप यांना सामोरे जावे लागले; मात्र कोणत्याही टप्प्यावर कॉम्रेड कांगो यांची चळवळीवरील निष्ठा ढळली नाही. त्याच वेळी त्यांनी पोथीनिष्ठ भूमिका स्वीकारून विचारांचे दरवाजे बंद केले नाहीत. उलट त्यांनी मोकळेपणाने चर्चा घडवून आणल्या, टीका स्वीकारली आणि गरजेप्रमाणे स्वतःलाही दुरुस्त केले. याच खुलेपणामुळे पक्षांच्या भिंतीपलीकडेही त्यांचे चाहते आणि सहकारी निर्माण झाले.
आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन हा कम्युनिस्ट विचारप्रणालीचा स्थायी भाव राहिला असला, तरी अनेकदा तो पोथीनिष्ठ ठरला आहे. मात्र डॉ. कांगो यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि विविध देशांना दिलेल्या प्रत्यक्ष भेटींमुळे त्यांचा स्वतःचा स्वतंत्र, चिकित्सक दृष्टिकोन विकसित झाला, जो त्यांच्या मांडणीचा अविभाज्य भाग बनला.
कॉम्रेड कांगो यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. समाजकारण आणि राजकारणात ते जितके व्यग्र राहिले, तितकीच त्यांची आस्था साहित्य, कला आणि संस्कृतीत राहिली. याच भूमिकेतून सिडको—म्हणजेच तत्कालीन ‘जुळे औरंगाबाद’—परिसरात ‘परिवर्तन’च्या स्थापनेत आणि वाटचालीत त्यांनी जाणीवपूर्वक सहभाग नोंदवला. ते उत्कृष्ट, अभ्यासू वक्ते आहेत; नाट्यकलावंत आहेत; आणि रचनात्मक कार्यातही सातत्याने अग्रभागी राहिले आहेत.
‘कम्युनिस्ट म्हणजे रुक्ष, निरस, नकारात्मक, दारिद्र्यावर प्रेम करणारा’ अशी एक धारणा समाजात जाणीवपूर्वक निर्माण केली गेली आहे; कामगार चळवळीकडेही जणू एखाद्या अपरिहार्य पापाप्रमाणे पाहिले जाते. या समजुतीला छेद देत, मानवता, शांतता, समता आणि बंधुता हीच कम्युनिस्ट चळवळीची व्यापक आणि अंतिम उद्दिष्टे आहेत, या विश्वासावर त्यांनी कधीही नैराश्याला थारा दिला नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता, खऱ्या अर्थाने निस्पृह राहून त्यांनी सार्वजनिक जीवनातील ही पाच दशकांची वाटचाल अविरत सुरू ठेवली.
पक्षातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. ‘युगांतर’ आणि सध्याचे ‘न्यू एज’ या साप्ताहिकांचे संपादक म्हणून त्यांनी वैचारिक पत्रकारितेला दिशा दिली. ‘पीपल्स पब्लिशिंग हाऊस’ची जबाबदारी सांभाळताना अनेक लेखक घडवले. ‘युगांतर’ दिवाळी अंकासह प्रकाशन संस्थेला अनेक पुरस्कार मिळवून देत त्यांनी पुरोगामी चळवळीला प्रतिष्ठा मिळवून दिली.
आमदार, खासदार किंवा नगरसेवक अशी लौकिक राजकीय पदे त्यांना मिळाली नाहीत— अपक्ष म्हणून उभे राहा किंवा पक्षात या, तुम्ही नक्की निवडून याल—अशी प्रलोभनेही कमी नव्हती. मात्र असा संधीसाधू विचार त्यांच्या मनाला कधीच स्पर्शून गेला नाही. या सर्वांपेक्षा मोठी आणि शाश्वत उपलब्धी म्हणजे त्यांनी घडवलेले कार्यकर्ते, लेखक आणि उभारलेल्या चळवळी. याच प्रक्रियेतून उद्याचा समाज आकार घेत आहे. कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांचे जीवन त्यामुळेच एक आदर्श, प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरते—आणि हीच त्यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या जीवनाची खरी, अमोल उपलब्धी आहे.