गॅससंदर्भात तक्रार करा व्हॉट्सॲप क्रमांकावर; रुग्णालयांना शंभर टक्के पुरवठा करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:06 IST2026-03-18T12:04:32+5:302026-03-18T12:06:03+5:30
रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

गॅससंदर्भात तक्रार करा व्हॉट्सॲप क्रमांकावर; रुग्णालयांना शंभर टक्के पुरवठा करण्याच्या सूचना
मुंबई : एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सूचित करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९७६९९१९२२१ जारी करण्यात आला आहे. रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
विधान परिषदेत नियम २६० अन्वये चर्चेवर उत्तर देताना मंत्री भुजबळ म्हणाले, की रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. इंधन उपलब्धतेबाबत योग्य ती माहिती दिली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई सुरू असून नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधातही जनजागृती केली जात आहे. रिफायनरीतील एलपीजी उत्पादन ९ हजार मेट्रिक टनांवरून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविले आहे.
नाशवंत मालाबाबत केंद्राकडून विचार सुरू
कंटेनर अडकल्यामुळे नाशवंत मालाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून कंटेनरवरील डॅमरेज शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाशवंत मालाबाबत केंद्र शासनही विचार करत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात स्थापन केलेल्या दक्षता पथकांनी केलेल्या कार्यवाहीनुसार जानेवारी ते १५ मार्च, २०२६ पर्यंत केलेल्या तपासण्यांची संख्या - २१२९, जप्त माल/गॅस सिलिंडरची संख्या - १२०८, दाखल गुन्हे-२३, अटक व्यक्तींची संख्या १८ आहे.
आखातातील इराण-अमेरिका युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यात काही ठिकाणी साठेबाजी, काळाबाजार सुरू असून त्याचे पडसादही विधीमंडळ अधिवेशनातही उमटत आहेत.