दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:17 IST2025-01-07T06:16:29+5:302025-01-07T06:17:26+5:30
अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तविला आहे

दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्यामुळे थंड वारे राज्य आणि मुंबईकडे वाहत असल्याने मंगळवारी, बुधवारी मुंबईचे किमान तापमान १४ अंश नोंदवण्यात येईल तर राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तविला आहे.
मुंबईसोबत कोकणातील अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल तर राज्यभरामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये एक अंकी तापमान नोंदवले जाईल. उत्तर महाराष्ट्रमध्ये काही शहरांचे किमान तापमान सहा अंश नोंदविले जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि राज्यभरात हवामानामध्ये प्रामुख्याने बदल होतील. त्या बदलांमुळे थंडीमध्ये आणखी भर पडेल.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविला जात आहे. सोमवारीदेखील मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे मुंबईकरांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला आनंद लुटता येत आहे. गुरुवारनंतर मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविली जाईल. आणि किमान तापमान सर्वसाधारण नोंदवले जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिली.
- मुंबई १६
- नाशिक १४
- धाराशिव ११
- परभणी ११
- सातारा १२
- अहिल्यानगर १२
- छ. संभाजीनगर १५
- जळगाव ११
- महाबळेश्वर १४
- मालेगाव १४