सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:53 PM2018-12-28T13:53:51+5:302018-12-28T14:03:31+5:30

एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली.

Co-operative Banks should give permission for branch merger: Co-operative banks demand | सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

googlenewsNext
ठळक मुद्देआरबीआय गव्हर्नरांशी झालेल्या बैठकीत दिले मागण्यांचे निवेदनइतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली होईल उपलब्ध विलिनीकरण झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा

पुणे : आर्थिक अडचणीतील नागरी सहकारी बँकेला एखाद्या नागरी सहकारी बँकेत विलिन करुन घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एकाहून अधिक नागरी बँकांना त्यांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) द्यावी अशा महत्त्वाच्या मागणीसह गुरुवारी (दि. २७) आठ पानी निवेदन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना देण्यात आले. बँकेच्या काही शाखांचे विलिनीकरण करुन घेण्याबाबत दास यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले. 
गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नर पदावरील सर्वोच्च अधिकाऱ्याने सहकारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबई येथील आरबीआयच्या मध्यवर्ती इमारतीत झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक अ‍ॅण्ड क्रेडीट सोसायटीचे (नॅफकॅब) अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, दिल्ली को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष शिवदास आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील सिंघानी आणि टास्क फोर्स फॉर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकचे (टॅफकब) प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 
 आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरी सहकारी बँकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नागरी सहकारी बँकांची तयारी आहे. मात्र, कोणत्याही एका बँकेला संपूर्ण बँक विलिनीकरण करुन घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडचणीतील बँकेचा सर्व तोटा एकटी बँक सहन करु शकणार नाही. त्यामुळे एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली. तसे झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा मिळेल. तसेच, इतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली उपलब्ध होईल. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी दिली. 
---------------------
गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नरने सहकारी बँकींग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या. सध्याचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी यापुर्वी तमिळनाडू सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबादारी सांभाळली आहे. त्यामुळे ते सहकारी बँकांच्या अडचणी नक्कीच समजून घेतील असा विश्वास वाटतो. 
विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळ

Web Title: Co-operative Banks should give permission for branch merger: Co-operative banks demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.