विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

By नंदकिशोर पाटील | Published: May 26, 2024 07:48 AM2024-05-26T07:48:22+5:302024-05-26T07:48:44+5:30

‘लोकमत’ला खास मुलाखत देताना गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अनेक महत्त्वाचे विषय मांडले

Chemical, not organic, natural farming is best for toxin-free food grains-Gujarat Governor | विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करणारे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे नुकतेच छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्ताने ‘लोकमत’ संपादक मंडळासह कृषितज्ज्ञ उद्योजक नंदकिशोर कागलीवाल यांच्यासोबत विशेष संवाद साधला... 

आचार्य देवव्रत यांनी हरयाणात कुरूक्षेत्रच्या १८० एकरवर नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने रासायनिक शेती सर्वांत हानिकारक असून, सेंद्रिय शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचे त्यांना आढळून आले. कमी खर्चात, विषमुक्त व मुबलक उत्पन्न देणारी नैसर्गिक शेतीच उपयुक्त असल्याचे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले. मागील काही वर्षांपासून एक चळवळ म्हणून नैसर्गिक शेतीचा ते प्रचार आणि प्रसार करत आहेत.

प्रश्न : नैसर्गिक व जैविक शेतीत काय फरक आहे ?
उत्तर : याविषयी मी आपल्याला उदाहरणासह सांगतो. आपण सर्वजण जंगलात जातो, तेथे वेगवेगळ्या प्रकारची हजारो झाडेझुडपे  असतात. या झाडांना कोणी युरिया अथवा डीएपी खत देते का? त्यांना कोणी शेणखत देत नाही. त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जात नाही तरीही जंगलातील या झाडा-झुडपांना ज्या नियमानुसार फुले आणि फळे येतात, तोच नियम आपल्या शेतीसाठी लागू होतो. यालाच नैसर्गिक शेती असे म्हणतात. नैसर्गिक शेतीमध्ये घरीच जीवामृत तयार करण्यात येते. याद्वारेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यात येते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढते. रासायनिक खते, कीटकनाशके अथवा जैविक खते, कृत्रिम गांडूळ खतांचा वापर असलेल्या शेतीतून पीक उत्पादन घेणे म्हणजे जैविक शेती म्हणतात.

प्रश्न : आपण नैसर्गिक शेतीकडे कसे वळलात?
उत्तर : कुरूक्षेत्र येथे आम्ही गुरूकुल चालवतो. या निवासी विद्यालयात राहणाऱ्या मुला-मुलींना भोजनाची सोय केली आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी आमच्या शेतात भाजीपाल्यावर कामगार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असताना बेशुद्ध पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कीटकनाशकाच्या वासामुळे जर एक व्यक्ती बेशुद्ध होतो, तर फवारणी केलेला भाजीपाला खाणाऱ्या मानवी शरीरावर काय परिणाम होत असेल? या पापाचा धनी मी होणार नाही आणि त्याच दिवशी रासायनिक शेती बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळलो. चार वर्ष सेंद्रिय शेती करून पाहिली. मात्र ही शेती तोट्याची असल्याचे दिसून आले. शेवटी नैसर्गिक शेतीकडे वळलो. तेव्हा जमिनीतील सेंद्रिय कार्बन ०.२ ते ०.४ होते. आता हा कर्ब १.७ पर्यंत वाढला आहे. तेव्हापासून नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ठरवले.

प्रश्न : भारतात रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिवापर होतो?
उत्तर : हरितक्रांतीच्या सुरूवातीला भारतात रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. तेव्हा कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांनी एकरी १३ किलो युरियाचा वापर करण्याची शिफारस केली होती. आता अंदाधुंदपणे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर होतो. यामुळे पिकाचे उत्पादन जास्त मिळत असेलही. एका अहवालानुसार, या दोन्ही धान्यांतील ४५ टक्के पोषक तत्त्वे गायब झाली आहेत. रासायनिक खतांचा असाच वापर पुढे होत राहिला तर सन २०५०पर्यंत उर्वरित पोषक तत्त्वावरील निम्मी पोषक तत्त्वे गायब होतील. सकस आहाराअभावी आपली रोगप्रतिक्रारशक्ती कमी झाल्याने कॅन्सर, हृदयविकार, बीपी आणि मधुमेहींची संख्या वाढत आहे. 
 
प्रश्न: तर मग सेंद्रिय शेती काय आहे?
उत्तर : यामध्ये सेंद्रिय शेतीचे मूळ हे भारतीय नाही  गांडूळचा उपयोग केला जातो. हे गांडूळ भारतातील नाही ते विदेशातून आयात केले जातात. याचे नाव इसेनिया फेटिडा आहे. हा गांडूळ शेणखत खातो. माती खात नाही. तो जमिनीत बिळ करतो. एवढेच नव्हे तर विशिष्ट तापमानाला तो मरणही पावतो. हे गांडूळ आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात धातू सोडते. त्यामुळे अनेक रोगांचा जन्म होतो.

प्रश्न : भारतात गुणवत्ता आणि पौष्टिक तत्त्वाकडे अधिक लक्ष  देण्याची गरज आहे का? 
उत्तर : ६०च्या दशकात जेव्हा देश अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करीत होता, तेव्हा ज्या शास्त्रज्ञांनी आपल्याला या संकटातून बाहेर काढले त्यांचा मी आभारी आहे. मी त्यांचा विरोधक नाही. ती त्या वेळची गरज होती. त्यांनाही वाटले नसेल की, देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर वाढेल.  प्रतिहेक्टर १३ किलो नायट्रोजन  वापरण्याची शिफारस स्वामिनाथन यांनी केली होती. तेव्हा पेरणीलायक क्षेत्रही कमी होते. शिवाय रस्ते, वीज आणि सिंचनाच्या सुविधाही कमी होत्या. यामुळे उत्पादन कमी होते. आता या सर्व सुविधा आणि पेरणीलायक क्षेत्र कितीतरी पटीने वाढले आहे. कृषी विद्यापीठांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून आणि कमी पाण्यात उत्पादन देणाऱ्या बियाणांचे संशोधन करायला हवे.

प्रश्न : नैसर्गिक शेती भारतीयांना परवडेल का?
उत्तर : ३० एकर नैसर्गिक शेतीसाठी केवळ एका देशी गायीची गरज असते. नैसर्गिक शेतीसाठी चांगले देशी बियाणे, शेणखत, गोमूत्र, बेसन आणि गूळ आणि माती यापासून जीवामृत तयार करावे. हे सर्व पदार्थ शेतकऱ्यांकडे असतात. रासायनिक खते अथवा कीटकनाशक खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नसते. रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने जमिनीत नैसर्गिक गांडुळांची पैदास वाढते. हे गांडूळच पिकाला पोषक खताची निर्मिती करतात. रासायनिक खताचा वापर करून जेवढे उत्पादन मिळते तेवढेच उत्पादन नैसर्गिक शेतीत मिळते. यामुळे नैसर्गिक शेती ही परवडणारी आहे, हे आमच्या शेतातील उत्पादनातून स्पष्ट झाले आहे. विविध कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी आमच्या शेताला भेट देऊन तसा अहवालही दिला आहे. सदृढ आरोग्यासाठी नैसर्गिक शेती हाच उत्तम पर्याय आहे.

प्रश्न : शेतकऱ्यांसमोर सेंद्रिय शेतीसाठी काय अडचणी आहेत ?
उत्तर : तसं पाहिलं तर सुमारे ३०० टन खतासाठी २० ते ३० पशुधनाची आवश्यकता असते. लहान शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र कमी असते. तेव्हा लहान शेतकरी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करील की या पशुधन सांभाळेल यामुळे जैविक शेती फेल झाली आहे. आयसीएआरचे काही शास्त्रज्ञ आपल्या विरोधात गेले. ते श्रीलंकेचे उदाहरण देतात. लोकांना वाटले की, मीही जैविक शेतीच करीत आहे.  जैविक आणि नैसर्गिक शेतीमध्ये फरक असल्याचे त्यांना माहिती नाही. मी तर म्हणतो की, जे जैविक शेती करतील ते उपाशी मरतील. कारण जैविक शेतीत कमी खर्चात अधिक उत्पादन देण्याची क्षमताच नाही.   गांडूळखत तयार करण्यासाठी दीड महिना लागतो. गांडूळखत बेडची उलथापालथ करणे, गांडूळ चाळणे याकरिता परिश्रम करूनही हातात काहीच पडत नाही. 

Web Title: Chemical, not organic, natural farming is best for toxin-free food grains-Gujarat Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात