CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:25 IST2025-11-18T07:22:57+5:302025-11-18T07:25:30+5:30
CNG Crisis: ‘सीएनजी’च्या तुटवड्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीसह स्कूल बससेवेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महामुंबईत सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या आरसीएफ परिसरातील मुख्य पुरवठा पाइपलाइनचे नुकसान झाल्याने अनेक पंपावरील गॅस पुरवठा बंद होता. याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूक आणि स्कूलबसवर झाला. या ‘गॅसकोंडी’मुळे सोमवारी ४० ते ४५ टक्के रिक्षा, टॅक्सी सेवा बंद होती. तर काही वाहन चालकांनी सीएनजीच्या तुलनेत महाग असलेले पेट्रोल भरत प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. परिणामी मुंबईकरांचे मोठे हाल झाले. तसेच अनेक ठिकाणी पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र संपूर्ण महामुंबईत होते.
रविवारपासून वडाळा स्टेशनमधून मुंबईतील सीएनजी पंपांवरील थेट गॅस पुरवठा बंद झाला आहे. ‘सीएनजी’च्या तुटवड्यामुळे सोमवारी मुंबईतील खासगी वाहनांसह रिक्षा, मीटर टॅक्सी, ऑनलाइन टॅक्सी आणि स्कूल बससेवेला मोठा फटका बसला. ‘सीएनजी’वरील हजारो वाहने रस्त्यावर उतरलीच नाहीत. नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. तर रिक्षा, टॅक्सीचालकांना व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
महानगरकडून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ३९८ सीएनजी पंपांवर गॅस पुरवठा केला जातो. महामुंबईत सुमारे ९ लाखांपैकी चार ते साडेचार लाख रिक्षा, ३८ हजार टॅक्सी, २ हजार शालेय बस, चार लाख खासगी चारचाकी वाहनांचा समावेश आहे. बेस्टच्या सीएनजी बसच्या फेऱ्यांवर मात्र काहीही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
ठाण्यात प्रवाशांच्या नशिबी पायपीट
ठाणे शहरात २० हजारांहून अधिक रिक्षा, तसेच ऑनलाइन ॲपद्वारे खासगी गाडीतून प्रवास करणाऱ्या हजाराे प्रवाशांचे साेमवारी सुद्धा खूप हाल झाले. सीएनजी पंपांवर इंधन भरण्यासाठी रिक्षांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हजारो ठाणेकरांना पायपीट करून घर व कार्यालय गाठावे लागले. ठाणे शहरातील माजिवडा, वागळे इस्टेट, काेपरीतील आनंदनगर, खाेपट आणि कॅसलमिल येथील गणेश पेट्राेलियम आदी ११ सीएनजी पंपांवर रिक्षा, तसेच खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
४५ टक्के बंद
सोमवारी ४० ते ४५ टक्के रिक्षा, टॅक्सी सेवा बंद होती. रविवारी काही ठिकाणी सीएनजी उपलब्ध झाल्याने रिक्षा, टॅक्सीचालकांनी तो भरून ठेवला. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर काही रिक्षा, टॅक्सी, पेट्रोलवर शेअरिंग रिक्षा, टॅक्सी सुरू होत्या. संध्याकाळनंतरही बंद झाल्या.
दुरुस्ती लवकरच
पाइपलाइनच्या दुरुस्तीनंतर सीजीएस वडाळा येथे पुरवठा पूर्ववत झाला की, एमजीएलच्या नेटवर्कमधील गॅस पुरवठा सामान्य होईल. मंगळवारी दुपारपर्यंत गॅस पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.- महानगर गॅस