गृह खात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?; अजित पवारांनी सावरली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:26 IST2022-03-24T14:26:03+5:302022-03-24T14:26:26+5:30

कॅबिनेट बैठक संपल्यानंतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे आरोप लावले त्यावर चर्चा झाली.

CM Uddhav Thackeray displeased with Home Department ?; Ajit Pawar's taking side of Dilip Walse Patil | गृह खात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?; अजित पवारांनी सावरली बाजू

गृह खात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?; अजित पवारांनी सावरली बाजू

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. यात विरोधी पक्ष भाजपा महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्रमक होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) सातत्याने मविआ सरकारला कोंडीत पकडत आहेत. आतापर्यंत मविआ सरकारच्या २ मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला तर एक मंत्री ईडीच्या कोठडीत आहे. भाजपा नेत्यांच्या चौकशी करण्यासाठी गृह खातं कुठेतरी कमी पडत असल्याचा सूर महाविकास आघाडीत असल्याचं समोर येत आहे.

त्यातच आता गृह खात्याच्या कारभारावार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या अनपौचारिक बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत जो पेन ड्राइव्ह बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टाकला. त्यावर गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी आक्रमक आणि सडेतोड उत्तर देण्याची गरज होती. परंतु वळसे पाटलांनी तसं केले नाही त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिल्याचा दावा टीव्ही ९ नं केला आहे.

कॅबिनेट बैठक संपल्यानंतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे आरोप लावले त्यावर चर्चा झाली. तेव्हा गृहमंत्र्यांनी आक्रमक, सडेतोड भाषण करण्याची गरज होती असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ही खंत व्यक्त केली तेव्हा दिलीप वळसे पाटील उपस्थित नव्हते त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळसे पाटील यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कायदेशीर भक्कम बाजू मांडणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली.

'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. ते बदल्याच्या भावनेने वागत असताना आपण का शांत बसायचे, असा संताप मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा अन् पुढची पावले उचला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना सांगितल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बैठकीत नियमित विषयांवर चर्चेनंतर अधिकाऱ्यांना जाण्यास सांगितले. नंतर सध्याच्या राजकारणावर वादळी चर्चा झाली. महाविकास आघाडीचे नेते, मंत्री भ्रष्ट असल्याचे चित्र भाजपकडून रंगविले जात आहे. सरकारकडे भाजपच्या बऱ्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत; पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांना सरकारची भीती नाही, अशी भावना जवळपास अर्धा डझन मंत्र्यांनी बोलून दाखवली. प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्यावर कारवाई होतच आहे; पण गेल्या सरकारच्या काळात किमान ६ ते ७ खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले, ती माहिती समोर आणली पाहिजे, माहितीवर न थांबता कारवाई केली पाहिजे असाही मंत्र्यांनी आग्रह धरला.

Web Title: CM Uddhav Thackeray displeased with Home Department ?; Ajit Pawar's taking side of Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.