अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:08 IST2025-09-29T15:07:24+5:302025-09-29T15:08:47+5:30
CM Devendra Fadnavis First Reaction on Ahilyanagar Clash: अहिल्यानगर येथे रांगोळी काढण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
CM Devendra Fadnavis First Reaction on Ahilyanagar Clash: मुस्लीम धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून त्याचे विटंबना करण्याता आल्याच्या प्रकारावरून अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर आले. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी कार्यक्रमात, प्रवासात असल्यामुळे या प्रकाराची संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. केवळ प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी यावर बोलेन. अलीकडच्या काळातमध्ये काहीतरी प्रयत्न होत आहे की, महाराष्ट्रामध्ये काही बोर्ड लावायचे किंवा काही तरी करायचे. येथील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यामागे नेमके कोण आहे, हेदेखील आपल्याला शोधावे लागेल. ते नक्की आम्ही शोधू आणि त्यावर कारवाई करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसाच प्रयत्न होत आहे का, याकडे लक्ष द्यावे लागेल
मुंबई, वसई भागात अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहेत. सोशल मीडियात अशा नावांचा वापर केला जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तेच मला म्हणायचे आहे की, जाणीवपूर्वक हे होत आहे का, ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीपूर्वी काही प्रयत्न करण्यात आले. एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसाच प्रयत्न होत आहे का, याकडे लक्ष द्यावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तत्पूर्वी, अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरुंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, सोमवारी याचे पडसाद उमटले. विटंबना करणाऱ्या संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस समजून सांगत होते. तरुण काही ऐकत नव्हते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते. मात्र आंदोलक ते मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
🕜 1.26pm | 29-9-2025📍Yavatmal.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra#Yavatmalhttps://t.co/iix5e5xhzG