“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:00 IST2025-10-11T13:00:24+5:302025-10-11T13:00:31+5:30
CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी फुटकी कवडी शेतकऱ्यांना दिली नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
CM Devendra Fadnavis:उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वतःला आरशात बघितले, तर अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत. मी यापूर्वीही सांगितले की, ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी फुटकी कवडी शेतकऱ्यांना दिली नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यातील पूरस्थिती, शेतकऱ्यांवरील संकट आणि सरकारची तुटपुंजी मदत या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट हंबरडा मोर्चा काढत आहे. यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या आधी आम्ही सत्तेत असताना देखील २० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे त्यांनी काही फार मोठे काम केलं असे नाही. उलट त्यांनी घोषणा केली होती, चालू खात्यावर आम्ही ५० हजार रुपये देऊ, मात्र, त्यांनी काहीही दिले नाही. उलट १६ लाख शेतकऱ्यांना महायुतीचे सरकार आल्यावर अनुदान दिले.
सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिलेले आहे. ठाकरेंनी त्यांच्या काळात केलेल्या कर्जमाफीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देतोय. त्या व्यतिरिक्त ६ हजार रुपये राज्याचे आणि ६ रुपये केंद्राचे देण्यात येत आहेत. विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. कुठे तरी पक्षाला जिवंत ठेवायचे आहे, म्हणून ते हंबरडे फोडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या जिल्ह्यात कुणी ओळखत नाही, त्यांच्या आरोपांवर मी काय उत्तर द्यायचे, असेही फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तराप्रसंगी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, खासदार पडले तेव्हा हंबरडा फोडला आणि विधानसभा निवडणुकीत आमदार पडले तेव्हा हंबरडा फोडला, आता आणखी किती वेळा हंबरडा फोडणार आहात, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हंबरडा मोर्चावर टीका केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या पॅकेजवर टीका करणारे उद्धव ठाकरे हे पैठण येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेटायला गेले तेव्हा ते एक लाख रुपयांचा धनादेश देणार होते, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्या शेतकऱ्याला एक फुटकी कवडीही त्यांनी दिली नाही. तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हाही तुम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी तुम्हाला घरी बसविल्याची टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.