'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:58 IST2025-07-01T13:57:40+5:302025-07-01T13:58:59+5:30
Monsoon Session Maharashtra: 'शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केल्याचाही विरोधकांचा आरोप

'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
Monsoon Session Maharashtra: गेल्या दोन-चार महिन्यात महाराष्ट्रात विविध मुद्दे गाजले. अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने महायुती सरकारले घेरले. त्यामुळे सोमवारपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधाने करतात, भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानसभेत जोरदार आक्षेप घेतला. तसेच, विधानसभेच्या दिवसभराच्या कामकाजावरही बहिष्कार घातला.
नाना पटोलेंचे निलंबन
शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत आहेत, अशा सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोलेविधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर 'मुख्यमंत्री माफी मागा' अशी पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली.
"शेतकऱ्यांविरोधात विधान करणाऱ्यांचे सरकारकडून समर्थन?"
राज्यात आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे, दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा करतात. लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही. यावरून अशी विधाने करणाऱ्यांचे सरकार समर्थन करत आहे का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
"सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न"
शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, निलंबन केले जाते. शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करू, तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू, अशी आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते, असा आरोप विरोधकांनी केला. यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.