“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 20:04 IST2025-11-25T20:01:51+5:302025-11-25T20:04:02+5:30
CM Devendra Fadnavis News: आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर लोकांसोबत राहून जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
CM Devendra Fadnavis News: अयोध्येत मंदिर झाल्यानंतर कळस आणि धर्मध्वजाचे अनावरण झाले. मंदिराचे काम पूर्ण झाले तेव्हाच समजले जाते जेव्हा कळसाचे काम पूर्ण होतं. अयोध्येच्या मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा नगरपालिकेवर फडकवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेत ते बोलत होते.
पारदर्शी आणि प्रामाणिकतेने कारभार चालविण्यासाठी भाजपने उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत कुणाला नावे ठेवण्याकरिता, टिका करण्यासाठी आलो नाही. आमच्याकडे प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. गावांवर लक्ष देताना शहरावर दुर्लक्ष होत आले आहे. गावातील लोक शहरात आले आहेत. पण, शहरावर लक्ष न दिल्याने ती बकाल झाली आहेत, असे फडणवीस म्हणाले.
जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घरे, शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या. आमच्या महाराष्ट्रातील विजयाला २३ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. पण, मी माझ्या बहिणींना सांगतो की, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाला नंतर विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या योजना बंद होणार परंतु विरोधकांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष झाले तरी सर्व योजनांचे पैसे सुरू आहेत. लाडकी बहीण योजना, शेतीला मोफत वीज, पिक विमा, तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.