‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:06 IST2025-08-12T09:06:04+5:302025-08-12T09:06:23+5:30
CM Devendra Fadnavis Reply To Uddhav Thackeray: जो पराभव होतो आहे, तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. त्यामुळे लोकांनी घरी बसवले, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
CM Devendra Fadnavis Reply To Uddhav Thackeray: महा जन आक्रोश वगैरे काही नाही. हा त्यांच्या मनातला आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाही, म्हणून मनाक्रोश चालला आहे. आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, मनाची चोरी करतो, त्यामुळे लोक आम्हाला मतदान करतात. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. उद्धव ठाकरे जनादेश चोर आहेत त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवले. जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसे वागायचे हे आम्हाला शिकवावे यापेक्षा मोठे दुर्दैव काय?, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. कारण त्यांच्या चेल्या चपाट्यांनी कफन खरेदीतही चोरी केली. त्यातही पैसा कमावला. आता उद्धव ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचे का? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला.
जो पराभव होतो आहे, तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही
विरोधी पक्षातील लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केला आहे, त्या निवडणूक आयोगाने यांना चार पत्रे दिली. सांगितले की, तुम्ही जे बोलत आहात ते शपथेवर सांगा. आरोप करणारे लोक का जात नाहीत? त्यांची हिंमत का होत नाही? का पुरावे देत नाहीत? रोज खोटे बोलायचे आणि पळून जायचे असे पळपुटे लोक आहेत. जो पराभव होतो आहे तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी विरोधकांची अवस्था आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची कीव येते, तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत तरीही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही काढून टाकत नाही? देवेंद्र फडणवीस यांनी काही भ्रष्टाचार केला नाही, असे गृहीत धरू. मग तुम्ही भ्रष्ट लोकांवर पांघरुण का घालता? भाजपा म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. तसे भ्रष्ट मंत्र्यांच्या जागीही कुणी मिळत नाही का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे की, मला या लोकांना काढायचे आहे पण सहन होत नाही आणि सांगता येत नाही असा दबाव आहे. देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर आहेत असे काँग्रेसने त्यांना म्हटले आहे. चांगला शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.