मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 05:57 IST2025-07-30T05:54:35+5:302025-07-30T05:57:39+5:30

बेछूट विधाने, आक्षेपार्ह वागणुकीबद्दल स्पष्टीकरण ऐकणार नाही, थेट कारवाईच; मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार

cm devendra fadnavis get very agitated in cabinet meeting will not tolerate indiscipline warns ministers and speaks harshly for 20 minutes | मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल

मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काही मंत्र्यांचे बेशिस्त वर्तन आणि बेछूट विधाने यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. आता झाले ते खूप झाले, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. खुलासाही न घेता कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांना दिला.

यापुढे बेताल वागले, बोलले तर थेट कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. याचा अर्थ कोकाटे वा इतर वादग्रस्त मंत्र्यांना वगळले जाणार नाही, असा घेतला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अजेंड्यावरील विषयांवर निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पाठवले. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न होते. २० मिनिटे त्यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, वादग्रस्त विधाने व कृती आता अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही अखेरची संधी समजा. यापुढे कोणाचा खुलासाही घेणार नाही. 

ऊठसूट माध्यमांशी बोलू नका

मंत्र्यांनी ऊठसूट माध्यमांशी बोलायचे कारण काय? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यापेक्षा आपापल्या विभागाच्या कामात गांभीर्याने लक्ष घाला. माध्यमांना बातम्याच हव्या असतात, तुम्ही काहीही बोलाल, कसेही वागाल तर बातम्या होतीलच. माध्यमे सहकार्य करतात; पण शेवटी  टीकेची संधी सोडत नाहीत, हेही लक्षात ठेवा. तुमच्या खात्याबाबत चुकीची बातमी आली तर तत्काळ खुलासा करा, वाद ओढवून घेण्याचे टाळा.

मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार

कोकाटे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, योगेश कदम हे मंत्रीही वादात सापडले आहेत. कोकाटेंचा विधान परिषदेत ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते वादग्रस्त विधाने करत आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत रुद्रावतार धारण केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन केले, असे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: cm devendra fadnavis get very agitated in cabinet meeting will not tolerate indiscipline warns ministers and speaks harshly for 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.