CM Devendra Fadnavis First Reaction Over Best Election 2025: ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. ठाकरे बंधूंचा २१-० ने पराभव झाल्यानंतर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया देताना ठाकरेंवर टीका केली.
या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. परंतु, निकाल लागला आणि ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही, हे स्पष्ट झाले. दुसरीकडे, बेस्ट सोसायटीची निवडणूक ही कामगार क्षेत्रातील पहिली स्वतंत्र निवडणूक असून पक्षीय पाठिंबा न घेता आम्ही ७ जागांवर विजय मिळवला. ८ जागा अवघ्या ३० ते ४० मतांच्या फरकाने निसटल्या असून कमी फरकाने पराभूत झालेल्या जागांसाठी फेरमतमोजणी करण्याची मागणी आ. प्रसाद लाड यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही एका पतपेढीची सहकारी संस्थेची निवडणूक होती, त्यात काही मोठे नाही. यामध्ये राजकारण करू नये असे माझे मत होते. पण त्यांनी (ठाकरे बंधू) त्याचे राजकारण करण्यास सुरुवात केली. ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत आणि ठाकरे ब्रँड जिंकेल, असे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या राजकारणाला जनतेने उत्तर दिले आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे टीका केली.
दरम्यान, पतपेढीसारख्या साध्या निवडणुकीतही लोकांनी ठाकरेंना नाकारले आहे. मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला आहे. आम्ही अशा कोणत्याही निवडणुकीचे राजकीयीकरण करत नाही. कोणीही ते करू नये, असेच माझे मत आहे. शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे असले तरी त्यांनीही या निवडणुकीत कसलेही राजकारण आणले नाही. ज्यांनी ते केले, त्यांचे लोकांनी काय केले ते दिसले आहे. लोकांना ठाकरे ब्रॅण्ड वगैरे आवडलेले दिसत नाही, त्यामुळेच त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्यांना रिजेक्ट केले गेले, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.