CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:06 IST2025-11-13T11:14:57+5:302025-11-13T12:06:33+5:30
राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींवर बरीच चर्चा सुरू असते. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका खासगी कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईतील ताज लँडस हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. याआधीही राज आणि फडणवीस मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या सोहळ्यानिमित्त एकत्र येणार होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र आज अनेक दिवसांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येत आहेत.
माधव अगस्ती यांच्या बॉलिवूड फॅशन इंडस्ट्रीतील ५० वर्षाच्या कारकिर्दीनिमित्त ताज लँड्स हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात पुस्तक प्रकाशनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. हे दोन्ही नेते या कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काय बोलणे होते याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची आजची भेट लक्षवेधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. त्यात मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक वाढली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका मनसेने स्वबळावर लढल्या. मात्र त्यात मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. आता महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता संपल्याचे दिसून येते. त्यात मतचोरीचा आरोप करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे इतक्या दिवसांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट लक्षवेधी ठरणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री बऱ्याचदा दिसून आली आहे. फडणवीस हे अनेकदा शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरे हेदेखील फडणवीस यांना भेटायला जात असतात. मागील काळात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं समोर आले होते. या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींवर बरीच चर्चा सुरू असते. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.