ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:55 IST2025-10-01T09:55:30+5:302025-10-01T09:55:46+5:30
५ लाख नागरिकांना आरोग्य किट; ५ लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना गहू, तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत

ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा!
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
येत्या दोन-तीन दिवसांत नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यानंतर मदतीचे सर्वंकष धोरण ठरवू. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
...तर जास्तीचा तांदूळ
अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर केरोसीन, ३ किलो तूरडाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पिठाच्या गिरण्या बंद असतील तर तिथे १० किलो अतिरिक्त म्हणजे २० किलो तांदूळ दिला जाईल.
स्कूल बॅग, वह्याही
पाच लाख शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, सहा वह्या, पुस्तके, कंपास आणि पाण्याची बाटली देणार. त्यासाठी सीएसआर अंतर्गत मदत घेणार.
नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण आणणार
सर्व आकडेवारी आल्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणारच आहे पण केंद्राच्या मदतीसाठी न थांबता खरडून गेलेली जमीन, विहिरी, पडलेली घरे यासह सर्वप्रकारच्या नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण अमलात आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘ते’ २,२०० कोटी रुपये नेमके कधीचे?
अतिवृष्टीग्रस्तांना २२०० कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असतानाच स्पष्ट केले होते. हा निधी ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे.
बँकांकडून वसुली नाही : शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस यायचे प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे. त्या नोटीसही जुन्या आहेत. तिथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना कुठेही वसुली करू देणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आरोग्य किट देणार
प्राथमिक औषधे (ताप, सर्दी, खोकला आदींवर), टूथब्रश, टूथपेस्ट, तेल, त्वचारोगावरील औषधे असलेल्या पाच लाख किटचे वितरण करणार.