भयंकर, भयावह! मुंबईसह महत्त्वाची शहरं बुडणार; महाराष्ट्राची झोप उडवणारा UNचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:28 IST2021-10-27T16:25:25+5:302021-10-27T16:28:01+5:30
मुंबईसह देशातील अनेक महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाण्याची भीती; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

भयंकर, भयावह! मुंबईसह महत्त्वाची शहरं बुडणार; महाराष्ट्राची झोप उडवणारा UNचा अहवाल
मुंबई: हवामानातील बदल, वाढतं तापमान यांचा परिणाम दिवसागणिक अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. येत्या काही वर्षांत सरासरी तापमान दीड डिग्री सेल्सिअसनं वाढणार असून त्याचा थेट परिणाम जगातील महत्त्वाच्या शहरांवर होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई यांच्यासह समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरं बुडण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्रानं याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
ग्लास्गोमध्ये संयुक्त राष्ट्राकडून जलवायू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाला सुरुवात होण्याच्या आठवडाभर आधी संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलाविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतातील २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामान बदलामुळे दुष्काळ आणि पुराची समस्या निर्माण होत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामचा समावेश आहे. भारताची तब्बल ८० टक्के लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंजनं एका अहवालातून जागतिक तापमान वाढीचा धोका अधोरेखित केला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अहवालानुसार, गंगा नदीतील पाण्याचं तापमान वाढत आहे. हिमकडे वितळत असल्यानं गंगा नदीची पाणी पातळी वाढवत असून तापमानातही वाढ होत असल्याची माहिती अहवालात आहे.
समुद्र किनारी वसलेल्या शहरांना जागतिक तापमान वाढीचा सर्वाधिक धोका आहे. पाणी पातळी वाढल्यानं अनेक शहरं बुडण्याचा धोका आहे. जगातील जवळपास १५ कोटी लोकांच्या घरात भरतीवेळी पाणी जाऊ शकतं. भारतातील ३.५ कोटी लोकांना अशा प्रकारच्या धोक्याला तोंड द्यावं लागू शकतं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तापमान वाढीचा मोठा धोका आहे. मुंबईतील निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या वर्षागणिक वाढत जाईल. २१०० पर्यंत शहरातील काही भाग पाण्याखाली गेलेले असतील.