स्वच्छ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:00 AM2019-10-05T08:00:00+5:302019-10-05T08:00:07+5:30

राज्यात सोलापुर अव्वल...

clean railway station competition Maharashtra behind | स्वच्छ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र पिछाडीवर

स्वच्छ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र पिछाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्देवर्दळीच्या स्थानकांत राज्यात दादर अव्वल‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत देशातील एकुण ७२० स्थानकांचे सर्वेक्षण स्थानकातील वर्षभरातील प्रवासी संख्या व महसुल यानुसार वर्गवारी

पुणे : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील रेल्वे स्थानकांच्या केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचे दिसते. पहिल्या शंभर प्रमुख स्वच्छ स्थानकांमध्ये राज्यातील केवळ सहा स्थानकांचा समावेश झाला आहे. त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानक राज्यात अव्वल ठरले असून देशात एकोणिसाव्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठ दादर (३३) व पुणे (५६) स्थानकाचा क्रमांक लागतो. उपनगरीय स्थानकांमध्ये मात्र मुंबईतील अंधेरी स्थानक देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने देशातील एकुण ७२० स्थानकांचे सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण करताना स्थानकातील वर्षभरातील प्रवासी संख्या व महसुल यानुसार वर्गवारी करण्यात आली. त्यामध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकांचे (एसजी) दोन व इतर प्रमुख स्थानकांचे (एनएसजी) चार गट करण्यात आले. ही स्थानके अनुक्रमे १०९ व ६११ एवढी आहेत. तसेच सर्वेक्षण करताना रेल्वे परिसर, पार्किंग, तिकीट खिडकी, फलाट, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षा कक्ष, लोहमार्ग, पादचारी पुल, आसन व्यवस्था अशा सर्वच ठिकाणची पाहणी करण्यात आली. त्याआधारे स्थानकांना गुणांकन देण्यात आले आहे. रेल्वेच्या १६ झोनमध्ये उत्तर पश्चिम रेल्वेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मध्य रेल्वेला तेरावे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत पाच क्रमांकांनी घसरले आहे. 
‘एनएसजी’ वर्गवारीमध्ये देशात जयपुर स्थानक सर्वाधिक स्वच्छ ठरले आहे. त्यापाठोपाठ जोधपुर आणि दुर्गापुरा स्थानकांनी स्वच्छतेत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे तिनही रेल्वे स्थानके राजस्थानमधील आहेत. महाराष्ट्रातील एकही स्थानके पहिल्या दहामध्ये नाही. राज्यात सोलापूर स्थानक  पहिल्या क्रमांकावर असून देशात १९ वे स्थान मिळाले आहे. पहिल्या शंभर स्थानकांमध्ये राज्यातील केवळ सहा स्थानकांचा समावेश आहे. सोलापुर पाठोपाठ, दादर, पुणे, मलकापुर, अमरावती, भुसावळ, चंद्रपुर, वर्धा, अहमदनगर व नाशिक रोड स्थानकांचा समावेश आहे. ही सर्व स्थानके प्रमुख स्थानकांमधील आहेत. तर उपनगरीय स्थानकांमध्ये पहिली चारही स्थानके मुंबईतील आहेत. त्यामध्ये अनुक्रमे अंधेरी, विरार, नायगाव, कांदिवली या स्थानकांचा समावेश आहे. तसेच मुंबईतील अनेक उपनगरीय स्थानकांनी या यादीत वरचे स्थान मिळविले आहे. 
---------------
एनएसजी १ मध्ये पुणे देशात चौथे
सर्व प्रकारच्या स्थानकांमध्ये ५६ व्या स्थानकावर असलेले पुणे रेल्वे स्थानक वर्षभरात २ कोटींहून अधिक प्रवासी संख्या असलेल्या स्थानकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आले आहे. पहिल्या क्रमांकावर सुरत तर त्यापाठोपाठ दादर व सिंकदराबाद स्थानके आहेत. या वर्गवारीमध्ये देशातील २१ स्थानके आहेत. देशातील प्रमुख स्थानकांचा या वर्गवारीमध्ये समावेश आहे. पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. स्वच्छतेसाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
...........
राज्यातील पहिली दहा स्वच्छ स्थानके (कंसात देशातील स्थान व क्षमतेनुसार गट)
१. सोलापुर (१९/एनएसजी २)
२. दादर (३३ /एनएसजी १)
३. पुणे (५६ /एनएसजी १)
४. मलकापुर (७५ /एनएसजी ४)
५. अमरावती (९७/ एनएसजी ३)
६. भुसावळ (९९ /एनएसजी ३)
७. चंद्रपुर (११३/ एनएसजी ४)
८. वर्धा (११४ /एनएसजी ३)
९. अहमदनगर (१२४ /एनएसजी ३)
१०. नाशिक रोड (१२६/ एनएसजी २)
--------------प्रवासी संख्येनिहाय प्रमुख स्थानकांची वर्गवारी
एनएसजी १ - २ कोटींहून अधिक
एनएसजी २ - १ ते २ कोटी
एनएसजी ३ - ५० लाख ते १ कोटी
एनएसजी ४ - २० ते ५० लाख
--------------------------
स्वच्छ स्थानकांचे निकष
- हरित स्थानकासाठीचे प्रयत्न
- कचरा व्यवस्थापन
- वीज व्यवस्थापन
- आएसओ आणि हरित प्रमाणपत्र 

Web Title: clean railway station competition Maharashtra behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.