मुंबई - विलीनीकरणानंतर आम्ही अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले. दादांचे स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठे करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रवादीचे विलीनीकरण घडवून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून पुन्हा चर्चांनी जोर धरला आहे.
अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार अतुल बेनके यांनीही विलीनीकरणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिंदे यांच्या लेखातील काही मुद्द्यांना आक्षेप घेतला आहे. अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे षडंयत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला, असा आरोपही शिंदे यांनी लेखात केला आहे. पण झालेली चूक आता दुरुस्त करायची या विचाराने अजितदादा गेल्या चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते, असे शिंदेंनी म्हटले. ते जयंत पाटील व शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते. त्यासाठीच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती. १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर पक्षाची सर्व धुरा अजित पवारांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय सुद्धा सर्व नेत्यांनी केला होता, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
शिंदेंचे म्हणणे चुकीचे; सुनील तटकरेंचा आक्षेपशशिकांत शिंदे यांच्या लेखावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तटकरे म्हणाले की, त्यांनी लिहिलेले चुकीचे आणि गैरलागू आहे. अशा प्रकारचे लिखाण त्यांनी करू नये. अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे षडंयत्र रचून केलेल्या आरोपांमुळे दादांनी निर्णय घेतला असे ते यापुढेही बोलत राहतील तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईन.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल की नाही याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी इथून पुढे एकत्रच राहायचे ठरवले आहे. या भूमिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. - अतुल बेनके, माजी आमदार, अजित पवार गट
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण शंभर टक्के झाले पाहिजे. आपल्या नेत्याला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर राष्ट्रवादीचे विलीनीकरण व्हावे. तसे झाले तर आम्हाला आनंद होईल. सुनेत्रा पवार या आता आमच्या नेत्या आहेत. त्यांच्या मागे दोन्हीही पक्षांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.- हिरामण खोसकर, आमदार, अजित पवार गट
Web Summary : NCP merger proposal gains support from some MLAs, but Sunil Tatkare objects, hinting at internal conflict. Shinde's claims of a planned merger are refuted, highlighting deep divisions within the party despite calls for unity.
Web Summary : एनसीपी विलय प्रस्ताव को कुछ विधायकों का समर्थन, लेकिन सुनील तटकरे ने जताई आपत्ति, आंतरिक संघर्ष का संकेत। शिंदे के विलय की योजना के दावों का खंडन, एकता के आह्वान के बावजूद पार्टी में गहरे मतभेद।