ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 05:51 IST2025-09-27T05:50:31+5:302025-09-27T05:51:22+5:30
नाईकांच्या जनता दरबारांमुळे नाराजी, तब्बल आठ महिन्यांनंतर झाली बैठक

ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
ठाणे - ठाणे शहर व जिल्ह्यातील अन्य शहरांत वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे वरचेवर जनता दरबार घेत असल्याने शिंदेसेना व नाईक यांच्यात संघर्ष सुरू असून, शुक्रवारी तब्बल आठ महिन्यांनंतर पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर नाईक यांनी बहिष्कार घातल्याची चर्चा आहे. नाईक यांचा जनता दरबार बंद करण्याकरिता नवी मुंबईतील शिंदेसेनेचे पदाधिकारी किशोर पाटकर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
नाईक यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे व नाईक यांच्यात रस्सीखेच सुरू होती. रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद जसा चिघळला तसा तो ठाण्यात चिघळला नसला तरी नाईक यांनी अनिच्छेने पालघरचे पालकमंत्रिपद स्वीकारले. त्यानंतर नाईक यांनी ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या शहरांत जनता दरबार आयोजित करण्याचा सपाटा लावला. या जनता दरबारात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आदेश दिले. यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता आहे.
मतभेदांचे नेमके मुद्दे आहेत तरी काय?
नवी मुंबईतील शिंदेसेनेचे पदाधिकारी किशोर पाटकर यांनी नाईक यांचा जनता दरबार रोखण्याकरिता न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना अपयश आले. शिंदेसेनेचे नेते हे ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याची भाषा करीत असताना नाईक हे ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसवणार, असे सातत्याने बजावत आहेत. आठ महिन्यांपूर्वी जानेवारीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही नाईक यांनी दांडी मारली होती; परंतु ती महायुती सरकार आल्यानंतर झालेली पहिलीच बैठक होती.