देशभरात लॉकडाउन-इंधन संपल्याची अफवा; पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:32 IST2026-03-25T06:31:49+5:302026-03-25T06:32:32+5:30
काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या.

देशभरात लॉकडाउन-इंधन संपल्याची अफवा; पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आखातातील युद्धाची झळ बसत असतानाही भारतात सध्या पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे, तरी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवांमुळे देशात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलपंपांवर नागरिकांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारीही रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या.
३७ अंश तापमानात काेल्हापूरकर रस्त्यावर
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी उसळली. उन्हाच्या ३७ अंश तापमानातही नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्याने पंपचालक व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जळगावमध्ये ६ पंप ‘कोरडे’ठाक
जळगावात इंधन कंपन्यांकडून लोड उशिराने दाखल झाल्याने मंगळवारी सकाळी शहरातील ६ पेट्रोल पंपांवरच्या इंधनाने तळ गाठला. त्यामुळे ‘पेट्रोल-डिझेल संपले’ या अफवेला बळ मिळाले आणि सोमवारनंतर मंगळवारीही इंधन भरणाऱ्यांच्या पंपांवर रांगा लागल्या. सायंकाळी ६ पैकी तीन पंपांवर साठा उपलब्ध झाल्यानंतर ग्राहकांसाठी खुला करण्यात आला.
नागपूरमध्ये लांब रांगा
नागपूर शहरातही पेट्राेल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. नंदनवन, सक्करदरा, गुरूदेवनगर, पूर्व वर्धमन नगर, पंचशील चौक, वर्धा रोड, संविधान चौक, राहाटे काॅलनी गोरक्षण, हिंगणा रोड आदी पंपांवर रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक जाम झाली होती. पेट्रोल पंपांवर गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त होता. दुसरीकडे, इंधन टंचाईच्या भीतीमुळे बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून पेट्रोल पंपावर नागरिकांना गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.