कोवळ्या वयामध्येच मुलींचे हात पिवळे! मराठवाड्यामध्ये बालविवाह सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 05:48 IST2021-10-27T05:47:37+5:302021-10-27T05:48:10+5:30
Child Marriage : विशेष म्हणजे टॉप १० जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील सर्वच आठही जिल्ह्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोवळ्या वयामध्येच मुलींचे हात पिवळे! मराठवाड्यामध्ये बालविवाह सर्वाधिक
- सोमनाथ खताळ
बीड : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०१९-२०) मधून अधोरेखित झाले आहे. अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात राज्यात सर्वांत आघाडीवर मराठवाडा आहे. यात परभणी जिल्हा अव्वल आहे.
विशेष म्हणजे टॉप १० जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील सर्वच आठही जिल्ह्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेला बीड जिल्हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ मध्ये बालविवाह लावण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, नव्या सर्वेक्षणात बीड जिल्हा दुसऱ्या स्थानावर आला आहे. तिथे बालविवाहांच्या प्रमाणात घट होत आहे.
धुळे तिसऱ्या तर सोलापूर चौथ्या स्थानावर आहे. इतर जिल्ह्यांना हे प्रमाण कमी करण्यात यश आले असले तरी राज्यात बालविवाह थांबले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजी मरायच्या आत नातीचे लग्न...
बालविवाहाचे मूळ कारण परिस्थिती आहे. ऊसतोडणीला जाताना जोडीला जास्त उचल मिळते म्हणून लग्न लावून दिले जाते. तसेच आजी मरायच्या आत नातीचे लग्न व्हावे, कमविणारा अथवा नाेकरदार मुलगा भेटल्यास, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास एक वर्षाच्या आत लग्न लावणे, यासारख्या कारणांनी मुलींचे बालवयातच लग्न लावले जाते.
२०२१ या वर्षात बीड जिल्ह्यात जवळपास २०० बालविवाह रोखण्यात यश आले आहे. एकट्या मे महिन्यात ८३ विवाह रोखले.
- तत्त्वशील कांबळे,
राज्य बालहक्क कार्यकर्ता
बालविवाहाचे प्रमाण बीडमध्ये कमी झाले आहे. बालविवाह रोखण्यासाठी तिथे सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- सोनिया हांगे,
प्रकल्प समन्वयक, युनिसेफ, बीड
बालविवाहांची आकडेवारी
जिल्हा सर्वेक्षण सर्वेक्षण
क्र. ५ क्र. ४
परभणी ४८ ४५
बीड ४३ ५२
धुळे ४० ३५
सोलापूर ४० ३७
हिंगाेली ३८ ४१
उस्मानाबाद ३७ ३१
औरंगाबाद ३६ ४५
जालना ३५ ५०
नांदेड ३४ ४२
लातूर ३३ ३७