राज्यात चिकुनगुनियाचा फैलाव, रुग्ण वाढले; नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 05:58 IST2025-01-05T05:57:04+5:302025-01-05T05:58:05+5:30

देशात १२,५८७ रुग्ण, त्यापैकी सर्वाधिक ४,७९२ रुग्ण महाराष्ट्रात

Chikungunya outbreak in the state, number of patients increases; Nagpur has the highest infection, Mumbai is second | राज्यात चिकुनगुनियाचा फैलाव, रुग्ण वाढले; नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

राज्यात चिकुनगुनियाचा फैलाव, रुग्ण वाढले; नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक  ५,७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने वैद्यकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.

चिकुनगुनिया हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो. डेंग्यूसारखी लक्षणे असली तरी या आजारासाठी भिन्न उपचारांची आवश्यकता असते. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ पर्यंत चिकुनगुनिया रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या आजाराचे १२,५८७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ४,७९२ रुग्ण महाराष्ट्रात आढळले. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. तेथे २,२१३ रुग्ण आढळले आहेत.

लक्षणे काय?

  • रुग्णाला दोन ते बारा दिवस जास्त ताप येतो. 
  • सांधे दुखतात, काही रुग्णांमध्ये वेदना अनेक आठवडे, महिनेही टिकतात. 
  • सांध्यांना सूज येते.
  • आजारपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अंगावर पुरळ येतो.
  • डोकेदुखी, डोके दाबल्यासारखे जाणवते.


यापूर्वी या आजाराचे रुग्ण राज्याच्या ग्रामीण भागात आढळत असत. आता मुंबईतही त्यांची संख्या वाढली आहे.  या आजारात लक्षणानुसार औषध दिले जाते. आजूबाजूच्या परिसरात डास होणार नाही, याची दक्षता घ्या, डासांपासून संरक्षण करा. कुठल्याही प्रकारचा ताप आणि अंगदुखी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
- डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, मेडिसिन विभाग, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल  

Web Title: Chikungunya outbreak in the state, number of patients increases; Nagpur has the highest infection, Mumbai is second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.