कर्नाटक निवडणुकीनंतर मविआचा जागा वाटपावर मोठा निर्णय; पटोले, राऊत, पाटलांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 19:00 IST2023-05-14T18:39:54+5:302023-05-14T19:00:48+5:30
लोकसभा, विधानसभा जागा वाटपावर चर्चा लवकरच, एकत्र लढणार; मविआच्या सिल्व्हर ओकवरील बैठकीत निर्णय

कर्नाटक निवडणुकीनंतर मविआचा जागा वाटपावर मोठा निर्णय; पटोले, राऊत, पाटलांची घोषणा
महाविकास आघाडीच्या सभा पाऊसमान लक्षात घेऊन करणार आहोत. तिन्ही पक्ष लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांसाठी जागा वाटपाची बोलणी करणार आहोत. यामध्ये तीन पक्षांसह आघाडीचे घटकपक्ष असणार आहेत. एक ठाम पर्याय जनतेसमोर देण्यावर आजच्या बैठकीत एकमत झाले. मविआ पुढील काळात आणखी जास्त ताकदीने काम करणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर आज चर्चा झाली. कोणत्या कारणांमुळे भाजपाचा एवढा मोठा पराभव झाला, यावर खूप तपशीलवार चर्चा झाली. भ्रष्टाचार, एजन्सींचा गैरवापर आदींचा परिणाम दिसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला त्यावर देखील चर्चा झाली. पुढे काय होणार आहे, कसे करता येईल यावर चर्चा झाली. उष्णता कमी झाली तर वज्रमुठ सभा पुन्हा सुरु होणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
नाना पटोले यांनी कर्नाटकच्या निकालावर भाष्य केले. दिल्लीचे झूट आणि कर्नाटकाची लूट याची देशाच्या जनतेला ओळख झाली आहे. कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजपाविरोधात मोदी, शहांविरोधात राग होता, तो निघाला. महाराष्ट्रातही भ्रष्टाचारी सरकार आहे. कर्नाटकात जो कोणी मुख्यमंत्री निवडला जाईल त्यांचा पुण्यातील वज्रमुठ सभेत सत्कार केला जाणार, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात १०० टक्के भ्रष्टाचार सुरु आहे असा आरोप केला. कर्नाटकचे सरकार जर ४० टक्के भ्रष्टाचार झाला असेल तर महाराष्ट्रात १०० टक्के सुरु आहे. आम्ही मजबूत आहोत, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असहाय्य आहेत. त्यांच्याएवढे असाहाय्य लोक आजवर पाहिले नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच जागावाटपाचा निर्णय तीन्ही पक्ष चर्चा करून घेणार असल्याचे सांगितले. तिन्ही पक्षांमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचेही राऊत म्हणाले.