मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करणार झंझावाती दौरे, ७ दिवसात २२ सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 22:04 IST2026-01-26T21:55:50+5:302026-01-26T22:04:07+5:30
महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील काही भागांमध्ये आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लागल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करणार झंझावाती दौरे, ७ दिवसात २२ सभा
२९ महापालिका निवडणुकीत सरस कामगिरी केल्यानंतर भाजपाने आता मिशन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत असून, स्थानिक पातळीवर भाजपा नेत्यांबरोबरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रचारात उतरणार आहेत. प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळणार असून, मुख्यमंत्री फडणवीस तब्बल २२ सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात दिसणार आहेत. १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी पुढील सात दिवसांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या २२ सभा होणार आहेत.
२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात मुख्यमंत्री फडणवीस झंझावाती प्रचार दौरा करणार आहेत. २८ जानेवारी रोजी रत्नागिरी, सिुंधदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. त्यानंतर ३ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही सभा होणार आहेत.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित
राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठीच निवडणूक होत आहे. ३२ जिल्हा परिषदांसह ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळे या निवडणुका अद्याप जाहीर होऊ शकलेल्या नाहीत. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून, निकालानंतरच या निवडणूक होऊ शकणार आहेत.