"आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरु देणार नाही, शेतकऱ्यांना नीट मदत देऊ": मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:06 IST2025-10-11T19:05:51+5:302025-10-11T19:06:08+5:30
उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली

"आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरु देणार नाही, शेतकऱ्यांना नीट मदत देऊ": मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Morcha: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक होत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी होत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवरुन त्यांनी सरकारला धारेवर धरलं. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाहीतर रस्त्यावर उतरणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंवर रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
"मदत नाही दिली तर रस्त्यावर उतरू हे त्यांनी म्हटलं तर ते मला मान्य आहे. फार चांगले आहे. हे विरोधी पक्षाचे काम आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे यावर त्यांचा विश्वास आहे. आम्ही केलेली मदत तीसुद्धा उद्धव ठाकरेंना मान्य आहे. त्यांचे म्हणणे एवढंच आहे की मदत नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू. आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरु देणार नाही. आम्ही मदत नीट देऊ," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत मिळणे सुरु झालेलं आहे. आम्ही त्यासंदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा दिलेला आहे. दुसरा टप्पाही देत आहोत. आमचा प्रयत्न दिवाळीपूर्वी जितकी जास्तीत जास्त निधी देण्याचा आहे. कदाचित काही निधी दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल. पण जास्तीत जास्त निधी दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करु, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"आम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन नकोय. आजचे मरण उद्यावर नकोय. आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे. मी तुमच्या खात्यात पैसे दिले तेव्हा मुख्यमंत्री काय डोळ्यावर हात ठेवून बसले होते? हा हंबरडा मोर्चा नाहीये हा इशारा मोर्चा आहे. सरकारला आम्ही इशारा देत आहोत की, जर तुम्ही कर्जमुक्त केले नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.