मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 22:53 IST2025-05-05T22:50:23+5:302025-05-05T22:53:11+5:30

Vaibhavi Deshmukh News: आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

Chief Minister Devendra Fadnavis praised Sarpanch Santosh Deshmukh's daughter Vaibhavi Deshmukh | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर क्रूरपणे हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने, दुःखाचा डोंगर पेलत हे घवघवीत यश  मिळवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वैभवी देशमुख हिचं कौतुक केलं आहे.

बारावीच्या परीक्षेमध्ये वैभवी देशमुख हिने घवघवीत यश मिळवल्याचे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला फोन केला. तसेच तिचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या. तसेच वैभवी हिला खास अभिनंदन पत्रही पाठवले. अंबेजोगाईचे SDO दीपक वाजळे यांनी वैभवी देशमुख हिला  प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र तिच्याकडे सुपुर्द केले.

वैभवी देशमुख हिला पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणिव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडिल स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठिवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय. ८५.३३ टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या अखेरीस म्हटले आहे.   

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis praised Sarpanch Santosh Deshmukh's daughter Vaibhavi Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.