...तेच काम ते अनेक वर्षांपासून करताहेत; CM फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:13 IST2024-12-23T18:10:45+5:302024-12-23T18:13:19+5:30
CM Devendra Fadnavis Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला.

...तेच काम ते अनेक वर्षांपासून करताहेत; CM फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
Devendra Fadnavis Rahul Gandhi News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. दलित असल्याने पोलिसांनी सोमनाथची हत्या केली असून, मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले, असे राहुल गांधी म्हणाले. या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
राहुल गांधींनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे -मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी याठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय त्यांचे आहे. तेच काम गेली अनेक वर्ष ते सातत्याने करताहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की, हे जे काही विद्वेषाचे त्यांचं जे काम आहे, त्याठिकाणी जाऊन पूर्ण केलं आहे", अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर केली.
"महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच, याठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी घोषित केलेली आहे. न्यायालयीन चौकशीत यासंदर्भातील सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचे कारण नाहीये. आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय, असे बाहेर आले, तर कुणालाही सोडले जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई केली जाईल", अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
"शरद पवारांना सांगितलं पूर्ण लक्ष घातलेलं आहे"
शरद पवार परभणी आणि मस्साजोगला गेले होते. ते तुमच्याशी बोलले, असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले, "असं आहे की, शरद पवारांनी मला एवढंच सांगितलं की, या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. मी त्यांना सांगितलं की, मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे."
राहुल गांधींनी फडणवीसांवर काय केलाय आरोप?
"मी सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटलोय. ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी (सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय) पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखविला. व्हिडीओ दाखवला. छायाचित्रे दाखविले. ही ९९ टक्के नाही, तर शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्री पोलिसांना मेसेज देण्यासाठी विधानसभेत खोटं बोलले", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.