Palghar bypoll: श्रीनिवास कुठे फसलास रे बाबा... मुख्यमंत्र्यांनी दाखवली शिवसेनेची जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 14:22 IST2018-05-26T14:18:03+5:302018-05-26T14:22:12+5:30
माणिकपूरमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करुन सेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

Palghar bypoll: श्रीनिवास कुठे फसलास रे बाबा... मुख्यमंत्र्यांनी दाखवली शिवसेनेची जाहिरात
माणिकपूर (वसई)- शिवसेनेच्या कालच्या पालघरच्या सभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लीप ऐकवण्यात आल्यावर आज मैदानात उतरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या "मित्र" पक्षाने केलेल्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी माझी ऑडिओ क्लीप मोडून तोडून दाखवली असे सांगत त्यांनी ती पूर्ण क्लीप उपस्थितांना दोन-तीनवेळा ऐकवली. आपण सत्तेत आहोत आपण सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही हे महत्त्वाचे वाक्य शिवसेनेने मुद्दाम वगळल्याचे उघड केले.
वनगा परिवार आपल्या पक्षाबरोबर कायम असणार आहे. चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र श्रीनिवास यांनाच आपला पक्ष तिकीट देणार होता, हे सेनेला माहिती होते तरिही त्यांनी आपला उमेदवार पळवला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच श्रीनिवास वनगा यांना निकालानंतर मातोश्री निवासस्थानाची दारे बंद होतील... आताच शिवसेनेने त्यांना आपल्यातून वगळलं आहे, असं सांगत त्यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली शिवसेनेची जाहिरात दाखवली. मतांचे आव्हान करणाऱ्या या जाहिरातीतसुद्धा श्रीनिवास वनगांचे नाव किंवा छायाचित्र नसल्याचे दाखवत श्रीनिवास कोठे फसलास रे बाबा असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सेनेवर टीका केली. वनगा परिवाराच्या मागे आपला पक्ष कायमच उभा राहिल असे त्यांनी सांगितले. पराभव दिसत असल्यामुळेच शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याचेही ते म्हणाले.