बीडमधील गुन्हेगारी मोडणार, हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधणार; फडणवीसांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:22 IST2024-12-20T15:20:15+5:302024-12-20T15:22:06+5:30
Devendra Fadnavis Speech: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळंमुळं खोदून काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

बीडमधील गुन्हेगारी मोडणार, हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधणार; फडणवीसांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
Beed Crime ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या एक ना अनेक चुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात खून, दमदाटी, खंडणी, बेकायदा वाळू उपसा, खोटे गुन्हे दाखल करणे असे अनेक प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारची भूमिका मांडताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळंमुळं खोदून काढणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडवरही कारवाई करू, असं आश्वासन दिलं आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारचा अॅक्शन प्लॅन सांगितला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीड जिल्ह्यात वाळूमाफिया, भूमाफिया अशा लोकांवर एक मोहीम हाती घेऊन संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसंच या सगळ्या प्रकरणात आम्ही दोन पातळीवर कारवाई करणार आहोत. या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही आयजी स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक एसआयटी गठित केली आहे. ही एसआयटी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करेल आणि दुसरीकडे, आम्ही न्यायालयीन चौकशीही करणार आहोत. इकोसिस्टमच्या अँगलने न्यायालयीन चौकशी होईल. तीन ते सहा महिन्यांत या प्रकरणांचा तपास पूर्ण केला जाईल," अशी घोषणा फडणवीस यांनी सभागृहात केली.
फडणवीसांनी कालही दिला होता सूचक इशारा
"महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. मात्र माझी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून अपेक्षा एवढीच आहे की, खंडणीखोरांना पाठीशी घालू नका. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथं जी घटना घडली त्यावर मी उत्तर देणारच आहे. पण अशा प्रकारे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घटना घडल्या तर गुंतवणूक येणार नाही. जे सगळे वसूलीबाज आहेत, ते कोणा ना कोणाचा आसरा घेतात. त्यामुळे माझ्या पक्षासहीत सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे की, आपण वसुलीबाजांना आसरा देण्याचं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुप्पटीने वाढेल. वसुली प्रकरणात जो असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल," असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिला होता.