उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 19:15 IST2022-12-02T19:15:36+5:302022-12-02T19:15:58+5:30
आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. भाजपात शिवप्रेमी असतील. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.

उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला
मुंबई - खासदार उदयनराजेंनी मुंडकं छाटण्याची भाषा करण्याऐवजी सगळ्यात आधी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा. ज्या पक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या पक्षात राहणं योग्य नाही. आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. त्यांनी भाजपात राहता कामा नये असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना सल्ला दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. भाजपाच्या अनेक लोकांनी मुंडकं छाटण्याची भाषा केलीय. हा संताप असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे भोसले यांच्या वाणीतून होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहायला हवं. उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. संभाजीराजे कोल्हापूरचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातील चीड बाहेर येणे स्वाभाविक आहे. सामान्य माणसांना चीड आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मुंडकं छाटण्याची भाषा न करता सगळ्यात आधी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. ज्या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज या आमच्या दैवताचा अपमान केलाय. त्या अपमानाचं समर्थन केले जातेय. यावेळी त्या पक्षात राहणे योग्य नाही. भाजपात राहता कामा नये. आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. भाजपात शिवप्रेमी असतील. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे. पण हे होत नाही असंही राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, छत्रपतींच्या महाराष्ट्राची बदनामी केलीय जातेय. पंतप्रधानांना रावण म्हटल्यावर हा गुजरातच्या जनतेचा अपमान आहे असं मोदी म्हणतात. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान होत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आमच्या तीव्र भावना आहे. शिवसेनेचा उदयनराजेंशी संवाद सुरू आहे. लवकरच त्याबाबत कृतीशीलता दिसेल असंही सूचक विधान संजय राऊतांनी केले आहे.
छत्रपतींच्या समाधीसमोर उदयनराजे आत्मक्लेश करणार
छत्रपतींचा अवमान करत असतील तर हा अपमान आम्ही कदापी सहन करु शकत नाही. या लोकांचे मोठे उपकार व योगदान आहे. प्रत्येक चांगल्या कार्याला सुरुवात करतात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान होतो ही गंभीर बाब असून त्यातून आम्हाला वेदना होत आहेत. त्यामुळे आत्मक्लेष करण्यासाठी आम्ही रायगडावर निघालो आहे. त्या ठिकाणी जाऊन वेदना मांडणार आहोत'' असं उदयनराजेंनी सांगितलं.