कितीही दुर्लक्षित केले तरी छत्रपती शाहूंचे विचार संपणार नाहीत, खासदार शाहू छत्रपतींचा भाजपला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:25 IST2024-12-06T15:24:26+5:302024-12-06T15:25:08+5:30

कोल्हापुरात शाहूप्रेमींची सरकार विरोधात निदर्शने

Chhatrapati Shahu thoughts will not end no matter how much they are ignored, MP Shahu Chhatrapati warns BJP | कितीही दुर्लक्षित केले तरी छत्रपती शाहूंचे विचार संपणार नाहीत, खासदार शाहू छत्रपतींचा भाजपला इशारा 

कितीही दुर्लक्षित केले तरी छत्रपती शाहूंचे विचार संपणार नाहीत, खासदार शाहू छत्रपतींचा भाजपला इशारा 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने गुरुवारच्या वर्तमानपत्रातून केलेल्या जाहिरातीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना दुर्लक्षित केले असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतानाच, असे कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी छत्रपती शाहूंचे विचार कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी भाजपला दिला.

गुरुवारी सर्वच वृत्तपत्रांत भाजपने केलेल्या जाहिरातीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा फोटा वगळला असून, त्याच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटल्या. या प्रकाराच्या निषेधार्थ समस्त शाहूप्रेमींच्यावतीने नर्सरी बागेतील शाहू समाधी स्मारक स्थळ येथे निदर्शने करत संताप व्यक्त केला.

यावेळी उद्धवसेनेचे विजय देवणे, माजी महापौर आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवाजीराव परुळेकर, भारती पोवार, अनिल घाटगे यांच्यासह समस्त शाहूप्रेमी उपस्थित होते.

खासदार शाहू छत्रपती म्हणाले, राज्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो जाणीवपूर्वक जाहिरातीमधून वगळण्यात आला आहे. सरकार विकासकामांसोबतच विचारांवरही चालत असते. परंतु शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार संपविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. सव्वासे वर्षांपूर्वी शाहू महाराजांना असाच त्रास देण्याचे काम तथाकथित लोकांनी केले होते. असा प्रयत्न करणाऱ्यांना आगामी काळात उत्तर देऊ. शाहू महाराज यांचा फोटो न छापण्याची घोडचूक केली असून, याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकाराबद्दल सरकारने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

निवडणुकीपुरते शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाचा वापर सरकारकडून सुरू आहे. आगामी काळात फुले, आंबेडकर यांचेही फोटो वगळण्याचे पाप सरकार करेल. म्हणूनच ही प्रवृत्ती थोपवण्याची गरज असल्याचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांचा अपमान करण्याचे काम भाजपने केले आहे. मात्र, या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील १० आमदारही गप्प बसले. या आमदारांचे शाहू महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचा आरोप बाबा इंदुलकर यांनी केला.

Web Title: Chhatrapati Shahu thoughts will not end no matter how much they are ignored, MP Shahu Chhatrapati warns BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.