राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी खदखद; छगन भुजबळ म्हणाले, "अनेक वर्षापासून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:01 IST2023-06-23T15:45:34+5:302023-06-23T16:01:29+5:30
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा ३ महिन्यांसाठी छगन भुजबळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी खदखद; छगन भुजबळ म्हणाले, "अनेक वर्षापासून..."
मुंबई - अलीकडेच राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदातून मला मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या अशी मागणी केली. अजित पवारांच्या या मागणीनंतर दादांना प्रदेशाध्यक्षपदाची ओढ लागल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर जयंत पाटलांनीही मला प्रदेशाध्यक्षपदी ५ वर्ष १ महिना झाला असल्याचे म्हटलं. राष्ट्रवादीच्या घटनेनुसार ३ वर्षापेक्षा अधिक कुणी एका पदावर राहू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू झाली.
त्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे म्हटलं. त्यानंतर आता भुजबळ जातीच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीलाच घरचा आहेर दिला आहे. भुजबळ म्हणाले की, काँग्रेसने नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष केले, वर्षा गायकवाड यांना मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पूर्वी राष्ट्रवादीत तसे होते. त्यानंतर हळूहळू दोन्ही पदे एकाच समाजाकडे ठेवण्याचे काम झाले. मंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदही असायचे काय पद्धत आहे कळाली नाही असं त्यांनी म्हटलं.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा ३ महिन्यांसाठी छगन भुजबळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यानंतर भुजबळ उपमुख्यमंत्री झाले आणि प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याला दिले. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असल्याची सातत्याने विरोधकांकडून टीका होते. त्यात अजित पवार यांनी संघटनेची जबाबदारी द्या म्हणत प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला होता. त्यानंतर भुजबळ यांनी ओबीसींना न्याय देणे गरजेचे आहे असं विधान केले होते.
काँग्रेसनं नाना पटोले, भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांना संधी दिली हे तिघेही ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ओबीसी समाजाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी समाजाला दिले पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. सध्याच्या घडीला राष्ट्रवादीत छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे नेते आहेत. त्यापैकी कुणालाही द्या. जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या दृष्टीने पक्षाला फायदा होईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीय समीकरण बनवले जाणार का हे पाहणे गरजेचे आहे.