"मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी..."; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:21 IST2024-12-17T13:10:39+5:302024-12-17T13:21:44+5:30
नाशिकमध्ये बोलताना प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

"मला जाऊ द्या म्हटलं तर सुनेत्रा पवारांचे ठरले, म्हणून मी..."; राज्यसभेवरुन भुजबळांनी सगळंच काढलं
Chhagan Bhujbal : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्याला राज्यसभेच्या सदस्यत्वाची ऑफर दिल्याचा दावा केला होता. मात्र आपण तो फेटाळल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं. सोमवारी नागपुरातील विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्यानंतर छगन भुजबळ नाशिककडे रवाना झाले होते. मागील महायुती सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री राहिलेल्या भुजबळांनी नव्या मंत्रिमंडळात समावेश न केल्याने आपण निराश झाल्याचे सांगितले.
मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारल्याचे यावेळी छगन भुजबळ म्हणाले. यावेळी छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीपासून पासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच्या घटनाक्रमाचा पाढा वाचून दाखवला. पक्षातील प्रमुख चर्चा करणार होते पण ती केली नसल्याचेही छगन भुजबळ म्हणाले. मी तुमच्या हातातील लहान खेळणं नसल्याचेही भुजबळांनी म्हटलं.
"लोकसभेला मी जातो म्हणालो तेव्हा तुम्ही ऐनवेळी कच खाल्लीत. तुम्ही नाव जाहीर केलं नाही. राज्यसभेची जागा आली तेव्हा मला जाऊ द्या असं म्हटलं. त्यावेळी सुनेत्रा पवारांना पाठवायचं ठरलं त्यामुळे मी काय बोललोच नाही. राज्यसभेची दुसरी जागा आली. त्याठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे नाव देण्यात आलं. मी त्यांना मला जाऊ द्या असं म्हटलं. त्यांना आम्ही शब्द दिल्याचे मला सांगितले. तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुम्ही लढलं पाहिजे असं मला सांगितले. त्यानुसार मी लढलो. आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा. कारण त्यांना मकरंद पाटील यांना मंत्री करायचे होते. आता ते नितीन पाटलांना सांगणार तू राजीनामा दे आणि खाली ये आणि मला सांगणार की तुम्ही वर जा. मला हे पाहिजे होतं मी लपून ठेवलं नाही. आता मी निवडून लढलो. आता मला मतदारसंघातले प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे मी राजीनामा देऊ शकत नाही. मी त्यांना सांगितले की एक दोन वर्ष द्या मी जातो. तोपर्यंत माझ्या मतदारसंघात स्थिर सावर करेन आणि मग तुमच्याकडे येतो. त्यावेळी त्यांनी म्हटलं की आपण चर्चा करु आणि बसू. त्यानंतर ते कधी बसलेच नाहीत असं छगन भुजबळ म्हणाले.
"प्रफुल्ल पटेलांना चार महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जायचं म्हटलं होतं. त्यावेळी माझं ऐकलं नाही आणि आता सांगत आहेत. मी काय लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं. तुम्हाला वाटेल तेव्हा वर जा खाली बसा, आता निवडणूक लढवा सांगता. मी राजीनामा दिल्यानंतर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल. मी त्यांना सांगितले होते की मला जायचं आहे पण थोडे दिवस द्या. मतदारसंघामध्ये जी कामे आहेत ती पूर्ण करतो. लोकांची समजूत काढू आणि मग जाऊ. तुम्ही उठ आणि बस म्हणणार असाल तर छगन भुजबळ तसा मनुष्य नाही," असंही भुजबळ म्हणाले.