"तुम्ही माझे मालक नाही झालात"; अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणतात, "एवढं बोलायला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:45 IST2025-01-06T14:29:13+5:302025-01-06T14:45:08+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्याबाबत केलेल्या विधानावरुन छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"तुम्ही माझे मालक नाही झालात"; अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणतात, "एवढं बोलायला..."
Chhagan Bhujbal on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी ओळखले जातात. रविवारी बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. मात्र अजित पवार यांच्या या विधानावरुन विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या या विधानाबाबत भाष्य केलं आहे. मतदार हे देशाचे मालक आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील मेडद येथील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन केले. यावेळी कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाली नसल्याचं म्हटलं. त्यापाठोपाठ नागरिकांनीही असंच म्हटलं. त्यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी, "अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?" असं विधान केलं. अजित पवाराच्या या विधानावरुन बोलताना त्यांनी एवढं बोलायला नको होतं असं छगन भुजबळ म्हणाले.
"त्यांनी एवढं बोलायला नको होतं एवढेच मी म्हणेन. लोक आपल्या मंत्र्यांचे मालक आहेत की नाही ही गोष्टच नाही. मतदाता हे राज्याचे आणि देशाचे मालक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना देशाचे मालक बनवले आहे," असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही केलेल्या विधानावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. "संजय गायकवाड यांना माजी मुख्यमंत्र्यांनी लगाम लावायला हवा. माझ्या बाबतीतही त्यांनी अशीच काही वक्तव्ये केली होती. एकनाथ शिंदे यांनी त्यांना समजवायला हवं," असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावरही खोचक टीका केली होती. येवल्यात कार्यकर्त्यांशी बोलताना वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता