"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:09 IST2025-12-24T17:07:40+5:302025-12-24T17:09:19+5:30
आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर, आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीची घोषणा केली. आम्ही दोघे बंधू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत, असे संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी जारीर केले. यावेळी, दोन्ही ठाकरे बंधूंच्या बोलण्याच्या केंद्र स्थानि 'मराठी माणूस'च होता. दरम्यान, "मी मराठी माणसांना सांगतोय आता जर चुकाल तर संपाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका," असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर, राज ठाकरे यांनी मराठी जनतेसह, पत्रकारांनाही पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या या विधानांचा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट समाचार घेतला आहे. आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का? असा सवाल बावनकुळे यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का? -
राज ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेत बावनकुळे यांनी राज यांच्यावर थेट टीका केली. बावनकुळे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस हेच, महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई करू शकतात. हे मराठी माणसाला आणि सर्वांनाच माहीत आहे आणि आम्ही सर्वच मराठी आहोत. कुणी इंग्रजी लोक नाही अहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमुधून राहायला आलोय का? असा सवाल करत, महाराष्ट्रातील मराठी माणसं आहोत आम्ही." एवढेच नाही तर, "महायुतीतील सर्वच लोक मराठी माणसं आहेत. त्यामुळे, मराठी-मराठी करून, मराठी भाषेचाही तुम्ही अपमाण केला आहे," असा घणाघातही बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? -
मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर, मुंबईतच मराठी माणसांच्या उरावरते उपरे नाचायला लागले, त्यावेळी न्यायहक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला ६० वर्ष होतील. आज पुन्हाम मुंबईच्या चिंधाड्या उडवायच्या हे मनसुबे, तेव्हा ज्यांना मुंबई हवी होती, त्याचेच प्रतिनिधी जे वर दोन जण बसले आहेत, त्यांचेही आहेत. आता आपण भांडत राहिलो, तर तो त्या हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. आज आम्ही आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. एकत्र आलो आहोत. ते एकत्र राहण्यासाठी. मी मराठी माणसांना सांगतोय आता जर चुकाल तर संपाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच संदेश मी आज संपूर्ण महाराष्ट्राला देतोय, ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते राज? -
पत्रकारपरिषद पारपडल्यानंतर, राज यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून माईक घेत, पत्रकारबंधूंना विशेष आवाहन केले. ते म्हणाले, "निघताना माझी केवळ एकच छोटी विनंती आहे, ज्यांचं मुंबईवर आणि महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर प्रेम आहे, अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती आहे की, आमच्या पाठीशी उभे रहा."