हीच ती वेळ? जयंत पाटील योग्य निर्णय घेणार का? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:47 IST2025-02-26T11:43:49+5:302025-02-26T11:47:32+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी त्यांना आश्वासन दिले आहे...

हीच ती वेळ? जयंत पाटील योग्य निर्णय घेणार का? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
BJP Chandrashekhar Bawankule News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा नेते, मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. जयंत पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तिथे उपस्थित होते. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही
जयंत पाटील यांनी काही राजकीय चर्चा केली नाही. मी जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही. जयंत पाटील हे अधिकृतपणे माझी वेळ घेऊन भेटायला आले होते. ही राजकीय भेट नव्हती. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकास कामांवर चर्चा झाली. जयंत पाटील यांनी सांगितलेले मुद्दे महत्त्वाचे होते. मी त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. माझ्या घरी तर त्यावेळी ४०० ते ५०० लोक होती, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन भेटायला आले होते. यावेळी विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. जयंत पाटील यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यावेळी माझ्यासोबत होते. जयंत पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा केली. मी त्यांना आश्वासन दिले आहे की, येणाऱ्या अधिवेशनात त्यांच्या समस्यांच्या संदर्भात एक बैठक माझ्या दालनात लावणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.